संयुक्त एकात्मिकप्रणाली सामना करू शकेल - डॉ. जसवंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 03:05 AM2020-04-12T03:05:12+5:302020-04-12T03:05:20+5:30

डॉ. जसवंत पाटील । सर्व शाखांनी कोरोनाबाबत परस्परपूरक कार्य करावे

The integrated system can withstand - Dr. Jaswant Patil | संयुक्त एकात्मिकप्रणाली सामना करू शकेल - डॉ. जसवंत पाटील

संयुक्त एकात्मिकप्रणाली सामना करू शकेल - डॉ. जसवंत पाटील

Next

प्रज्ञा केळकर-सिंंग ।
पुणे : कोणतेही शास्त्र श्रेष्ठ किंंवा कनिष्ठ नसते. प्रत्येक डॉक्टर रुग्णसेवेचे व्रत घेऊनच कार्यरत असतो. सध्या कोरोनामुळे जगात लाखो लोक जीव गमावत आहेत. या साथीवर मात करायची असेल, तर अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी किंंवा आयुर्वेद असा भेदभाव न करता सर्व शाखांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे मत ज्येष्ठ वैद्यकीयतज्ज्ञ डॉ. जसवंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. याबाबत प्रतिभाताई पाटील यांच्याशी बोलणे झाले असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे, हेही त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. पाटील म्हणाले, की सध्या कोरोनावर आपल्याकडे काहीच औषध उपलब्ध नाही. होमिओपॅथी, आयुर्वेदमधील औषधांनी, उपचारांना प्रायोगिक तत्त्वावर मान्यता दिल्यास झाला तर फायदाच होईल, नुकसान काहीच होणार नाही. सर्व प्रकारच्या शास्त्रांची विशिष्ट पद्धत असते. त्यातून कोणतेच शास्त्र परिणामकारक किंंवा अपरिणामकारक असे ठरवता येत नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाखांनी परस्परपूरक काम करून या संकटाचा सामना केला पाहिजे.
संयुक्त एकात्मिक प्रणालीवर माझा विश्वास आहे. विविध वैद्यकीय शाखा एकत्र येतात, तेव्हा त्या एकमेकांच्या उणिवा भरून काढू शकतात. माझेच शास्त्र चांगले असा अट्टहास न करता सर्वांनी एकमेकांना पूरक असे काम केले पाहिजे. मी काही वर्षांपूर्वी शासनाकडे संयुक्त एकात्मिक प्रणालीचा अहवालही सोपवला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पद्धतीचा विचार केल्यास हे संकट मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

जिथे अ‍ॅलोपॅथी थांबे, तिथे होमिओपॅथी लागू पडते
मी मूळचा अ‍ॅलोपॅथीचा डॉक्टर. अनेक वर्षे केईएम हॉस्पिटलमध्ये कार्यरत होतो. जळगावमध्ये स्वत:चे क्लिनिकही आहे. १९९५-९६ च्यादरम्यान माझ्या आईची तब्येत खूप बिघडली. मल्टिआॅर्गन फेल्युअर झाले होते. सर्व डॉक्टर मित्रांशी चर्चा केली, अनेक उपचार केले. मात्र, काहीच उपयोग होत नव्हता. माझ्यासह अनेक डॉक्टर हतबल, हताश झाले होते. त्यावेळी शेवटचा उपाय म्हणून होमिओपॅथीचे औषध देण्याचे ठरले. याचा काही उपयोग होणार नाही, अशीच माझी धारणा होती. मात्र, हा उपाय रामबाण ठरला. आईची तब्येत ७२ तासांत पूर्ण स्थिर झाली. मी खूप प्रभावित झालो. जिथे अ‍ॅलोपॅथी काम करीत नाही, तिथे होमिओपॅथी लागू पडते, यावर विश्वास बसला. त्यावेळी मी बीएचएमएसची पदवी प्राप्त केली. माझ्या दवाखान्यातील रुग्णांना अ‍ॅलोपॅथी अधिक होमिओपॅथी असे उपचार देऊ लागलो. रुग्णांच्या अनेक तक्रारी कमी झाल्या, त्यांच्यातील आजाराचे प्रमाण कमी झाले, असे डॉ. पाटील यांनी नमूद केले.

Web Title: The integrated system can withstand - Dr. Jaswant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.