उन्हाच्या वाढत्या झळा; हवामान बदलामुळे सर्दी-खोकल्याचा ताप, डॉक्टर सांगतात करा 'हे' उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 11:34 IST2026-03-09T11:33:45+5:302026-03-09T11:34:04+5:30
सकाळी गारवा आणि दुपारी तीव्र उष्णता असे वातावरण असल्याने सर्दी, खोकल्यासारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे

उन्हाच्या वाढत्या झळा; हवामान बदलामुळे सर्दी-खोकल्याचा ताप, डॉक्टर सांगतात करा 'हे' उपाय
पुणे : शहरात उन्हाळ्याची चाहूल लागली असून, दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे. शहरात गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने वाढ होत आहे. कमाल तापमान सुमारे ३५ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदविले गेले आहे, तर किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान राहिले आहे. सकाळी गारवा आणि दुपारी तीव्र उष्णता असे वातावरण असल्याने सर्दी, खोकल्यासारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी उलट्या-जुलाबाच्या तक्रारीही आढळून येत असून, लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.
डॉक्टरांच्या मते, हवामानातील अचानक होणारे बदल आणि उष्णतेमुळे विषाणूजन्य आजारांचा संसर्ग वाढत आहे. फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे अनेक रुग्णांमध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर बाहेरील खाद्यपदार्थ आणि शीतपेये सेवन केल्यामुळेही काही नागरिकांना उलट्या व जुलाबाचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्म्याशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. उन्हामुळे अंगावर पुरळ, स्नायूंमध्ये आकडी किंवा अशक्तपणा यांसारखे किरकोळ त्रास होऊ शकतात. काही वेळा चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे, तसेच हीट एक्झॉशनसारखे गंभीर त्रासही उद्भवू शकतात.
सध्या लहान मुलांमध्ये विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण अधिक दिसत आहे. सर्दी, ताप आणि खोकला ही लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. दुपारच्या वेळात मुलांना बाहेर घेऊन जाणे टाळावे. हलका आहार, पुरेसे पाणी,द्रवपदार्थ, आणि नारळ पाणी घ्यावे. मुलांना आजाराची लक्षणे दिसल्यास त्यांना शाळेत पाठवू नये, तसेच स्वच्छतेच्या सवयींकडे विशेष लक्ष द्यावे. - डॉ. नीलेश गुजर, बालरोगतज्ज्ञ.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे, पुरेसे द्रवपदार्थ घ्यावेत आणि हलके, सैलसर कपडे परिधान करावेत. पाणी, ताक, लिंबूपाणी आणि नारळपाणी यांसारखी नैसर्गिक पेये अधिक प्रमाणात घ्यावीत. साखरयुक्त शीतपेये, कॉफी आणि मद्यपान टाळावे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. - डॉ. संजय मुंढे, सहायक प्राध्यापक, औषधीशास्त्र विभाग, ससून.
शहरातील गेल्या पाच दिवसांतील कमाल व किमान तापमान
दिनांक - कमाल तापमान (अंश सेल्सिअस) - किमान तापमान (अंश सेल्सिअस)
४ मार्च - ३५.२ - १८.६
५ मार्च - ३६.० - १९.१
६ मार्च - ३६.८ - १९.४
७ मार्च - ३७.७ - १९.८
८ मार्च - ३७.५ - २०.१