Income Tax Raid : नेचर उद्योगसमूहावर आयकर विभागाचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:15 IST2025-02-05T15:14:58+5:302025-02-05T15:15:07+5:30

देसाई हे जरी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जात असले, तरी सध्या शरद पवार गटाशी त्यांची जवळीकता वाढल्याचे तालुक्यात चर्चा

Income Tax Raid Income Tax Department raids Nature Industries Group | Income Tax Raid : नेचर उद्योगसमूहावर आयकर विभागाचा छापा

Income Tax Raid : नेचर उद्योगसमूहावर आयकर विभागाचा छापा

सतीश सांगळे/ पोपटराव मुळीक

कळस/लासुर्णे :
इंदापुर तालुक्यातील कळस येथील उद्योजक अर्जुन देसाई यांच्या नेचर डिलाइट उद्योगसमूहावर आयकर विभागाने बुधवारी सकाळी छापा मारला. त्याचबरोबर देसाई यांचे जावई जय हिंद कॅटल फीडचे व्यवस्थापकीय संचालक मयूर कांतीलाल जामदार यांच्या निवासस्थानावरही आयकर विभागाचे पथक पोहोचले आहे. या छापेमारीमुळे इंदापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

अर्जुन देसाई हे मोठे उद्योजक असून, बांधकाम व्यावसायिक देखील आहेत. नेचर डिलाइट उद्योगसमूहाबरोबर देसाई इन्फ्रा नावाची कंपनीदेखील आहे. देसाई उद्योगसमूहाचे दुग्ध प्रकल्प, पशुखाद्य उत्पादन, पाणी प्रकल्प या ठिकाणी कार्यरत आहे. सुमारे २० लाख लिटर दैनंदिन क्षमता असलेला मोठा दूध प्रकल्प या ठिकाणी गेली आठ वर्षे कार्यरत आहे. राज्याच्या विविध भागांतून या ठिकाणी दूध आणले जाते. या माध्यमातून दूध पॅकिंग करून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येते. तसेच, बटर, लोणी, दूध पावडर, तूप यांचे उत्पादन घेऊन वितरण केले जाते. तसेच, पाणी प्रकल्प व पशुखाद्य उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. बुधवारी सकाळी ६ वाजता आयकर विभागाचे २५ अधिकारी आठ वाहनांच्या ताफ्यासह नेचर उद्योगसमूहात दाखल झाले. त्यानंतर त्यातील एका पथकाने देसाई यांच्या घरातही तळ ठोकला आहे.

दुसरीकडे देसाई यांचे जावई जय हिंद कॅटल फीडचे व्यवस्थापकीय संचालक मयूर कांतीलाल जामदार यांच्या बेलवाडी येथील पवार मळा या निवासस्थानी पहाटे आयकर विभागाने छापा टाकला. दुपारी दोन वाजेपर्यंत अधिकारी जामदार यांच्या निवासस्थानी तपासणीसाठी बसून आहेत, तर देसाई यांचे कदमवाडी (ता. माळशिरस जि.सोलापूर) येथील नातेवाईक संतोष कदम यांच्या देखील निवासस्थानी आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाल्याची चर्चा आहे. आयकरच्या या छापेमारीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आयकर छाप्याला राजकीय किनार

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्योजक अर्जुन देसाई यांनी शरद पवार गटाला सहकार्य केल्याची चर्चा आहे. देसाई हे जरी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जात असले, तरी सध्या शरद पवार गटाशी त्यांची जवळीकता वाढल्याचे तालुक्यात चर्चा आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील फलटण येथील विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावही आयकर विभागाने छापा मारला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे ही छापेमारी राजकीय हेतूनेच केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Income Tax Raid Income Tax Department raids Nature Industries Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.