नासाच्या नावाने शेकडो लोकांना घातला ६ कोटींना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 19:47 IST2023-02-01T19:47:13+5:302023-02-01T19:47:20+5:30
राईस पुलर भाड्यांच्या उत्पादनात गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळण्याचे आमिष दाखवले

नासाच्या नावाने शेकडो लोकांना घातला ६ कोटींना गंडा
पुणे : अमेरिकेतील अंतराळ संशोधन ‘नासा’च्या नावाने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रेडिओधर्मी दुर्लक्ष धातू राईस पुलर भाड्यांच्या उत्पादनात गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पुण्यात कोट्यावधींना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी राम गायकवाड (रा. माळवाड, अकलुज, सोलापूर), रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ (रा. कारखेल, पुणे) आणि राहुल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बाबासाहेब रामहरी सोनवणे (वय ५०, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. राईस पुलर या नावाने देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फसवणूकीचे प्रकार आजवर उघडकीस आले आहेत़.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी संगनमत करुन राईस पुलर धातूचे भांडे आपल्याकडे असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी साधु वासवानी चौकाजवळील हॉटेल रिट्टस येथे लोकांचा मेळावा घेतला होता. यामध्ये तुम्ही गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणावर फायदा मिळेल, असे सांगितले़ त्यांना बनावट कागदपत्रे तयार करुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केला. त्यानंतर या लोकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतले. गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने याची चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडे १०० तक्रार अर्ज
या प्रकरणात फसवणूक झालेल्या १०० हून अधिक नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिले होते. आतापर्यंत पाच ते सहा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रुइकर यांनी सांगितले.