पुणे : विद्यापीठ चौकात पीएमआरडीएने उभारलेल्या दुमजली उड्डाणपुलाच्या कामात त्रुटी असून, हा फ्लायओव्हर आहे कि 'फ्लॉ'ओव्हर, असा सवाल भाजप नगरसेवक सनी निम्हण यांनी उपस्थित केला आहे.
विद्यापीठ चौकात पीएमआरडीएने उभारलेल्या दुमजली उड्डाणपुलाच्या बाणेर रॅम्पचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. मात्र उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी काही समोर आलेल्या छायाचित्रांमुळे या पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या उड्डाणपुलाच्या एका भागातील जोडणी (जॉइंट) नीट झालेली नसल्याचा फोटो भाजप नगरसेवक सनी निम्हण यांनी आपल्या समाज माध्यमावर पोस्ट केला आहे. पुलाच्या कामाची गुणवत्ता संशयास्पद असल्याचा केला आहे. याच ठिकाणी यापूर्वी उभारलेला उड्डाणपूल तांत्रिक त्रुटींमुळे पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मोठी टीका झाली होती. पुढील २५ ते ५० वर्षांचा वाहतुकीचा विचार करून डबल डेकर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एवढ्या महत्त्वाच्या आणि महाकाय प्रकल्पात अशा प्रकारच्या त्रुटी राहिल्या असतील तर ते अत्यंत धक्कादायक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मेट्रो व्हायाडक्ट किंवा अशा प्रकारचे उड्डाणपूल प्रामुख्याने ‘प्रेस्ट्रेस्ड सेगमेंटल स्ट्रक्चर’ पद्धतीने उभारले जातात. या संरचनेत ‘पोस्ट-टेंशनिंग केबल्स’ मुख्य भार उचलतात. त्यामुळे बाहेर दिसणाऱ्या दोषांमुळे लगेच संरचना कोसळेल असे नसले तरी जॉइंट नीट न बसणे किंवा बांधकामातील त्रुटी दीर्घकालीन टिकाऊपणासाठी धोकादायक ठरू शकतात. अशाच प्रकारच्या तांत्रिक चुकीमुळे पूर्वी मुंबईत अपघात घडल्याची आठवणही नगरसेवक निम्हण यांनी करून दिली.
दरम्यान, पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. पुणे शहराला ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर’ म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. मात्र प्रत्यक्ष कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत असतील तर या प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सात दिवसांत उड्डाणपुलाची तपासणी पीएमआरडीए आयुक्तांचे आश्वासन
विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाच्या बाणेर रॅम्पमध्ये संभाव्य स्ट्रक्चरल त्रुटी असल्याचे निवेदन पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी यांना दिले. यावेळी चौधरी यांनी मुख्य अभियंता सात दिवसांत प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे नगरसेवक निम्हण यांनी सांगितले.
Web Summary : A BJP corporator questioned the quality of the Pune University flyover, citing faulty joints. He fears potential structural issues, recalling past incidents. An investigation is promised.
Web Summary : भाजपा पार्षद ने पुणे विश्वविद्यालय फ्लाईओवर की गुणवत्ता पर सवाल उठाया, जोड़ों में खराबी का हवाला दिया। उन्होंने संभावित संरचनात्मक मुद्दों से डर जताया, पिछली घटनाओं को याद किया। जांच का वादा किया गया है।