पुण्यात १ जानेवारीपासून हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 15:25 IST2018-11-16T15:04:37+5:302018-11-16T15:25:28+5:30
नववर्षानिमित्त पुणे पोलीसांनी वाहनचालकांच्या सुरक्षेचं मनावर घेतलं असून येत्या १ जानेवारी २०१९ पासून शहरात हेल्मेटसक्तीची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी दिली आहे.

पुण्यात १ जानेवारीपासून हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी !
पुणे : नववर्षानिमित्त पुणे पोलीसांनी वाहनचालकांच्या सुरक्षेचं मनावर घेतलं असून येत्या १ जानेवारी २०१९ पासून शहरात हेल्मेटसक्तीची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी दिली आहे. मात्र या सक्तीला पुणेकर सकारात्मक प्रतीसाद देतात की मागील दोन वेळेप्रमाणे पुन्हा हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी थांबबावी लागते याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. परिणाम म्हणून संपूर्ण देशभरातील सुमारे ३५ हजार व्यक्तींचा मृत्यू हेल्मेट परिधान न केल्यामुळे झाल्याची धक्कादायक आकडेवारी मागील काही दिवसांपूर्वी समोर आली होती.या सर्व बाबी लक्षात घेऊन पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. सध्या पुणे शहरात सुमारे २७ लाख दुचाकी असून दिवसेंदिवस त्यांची वाढती संख्या आहे. वाहनांची दाटी आणि अरुंद रस्ते यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे शहरात हेल्मेट सक्ती गरजेची आहे.
आयुक्त वेंकेटेशम यांनी कारभार स्वीकारल्यावर त्यांना वाहतूक प्रश्नाकडे लक्ष दयावे अशी विनंती अनेक पुणेकरांनी केली होती. त्यावेळीही त्यांनी हेल्मेट वापराच्या सक्तीबाबत सकारात्मक मत नोंदवले होते. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीला जनजागृती करून सक्ती करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता सुमारे दीड महिना आधी त्यांनी पुणेकरांची मानसिक तयारी सुरु केली आहे. यापूर्वी पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरु केल्यावर विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांनी एकत्रित कृती समिती स्थापन करून हेल्मेटसक्तीला विरोध केला होता.