'माझं पार टक्कल पडलंय ना, तरी लोक मला शिकवतायेत', भरसभेत अजितदादांच्या वक्तव्याने हशा पिकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:04 IST2025-12-01T17:03:24+5:302025-12-01T17:04:23+5:30
सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं. आता कुठल्या बाबा लोकांचं ऐकावं लागतं, याचा विचार तुम्ही करा”, असं मिश्किलपणे अजित पवार यांनी म्हटलं आहे.त मोठा हशा पिकला

'माझं पार टक्कल पडलंय ना, तरी लोक मला शिकवतायेत', भरसभेत अजितदादांच्या वक्तव्याने हशा पिकला
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये जाहीर सभा पार पडली. राजगुरूनगर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवरच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत अजित पवारानी मिश्किल टिप्पणी केली आहे. त्यामुळे भर सभेत मोठा हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांचं भाषण सुरू असताना एका पदाधिकाऱ्याने व्यासपीठावर त्यांच्याजवळ जात अजित पवारांना काहीतरी सांगितलं. त्यानंतर अजित पवार यांनी मिश्किलपणे भाष्य करत म्हटलं की, ‘माझं टक्कल पडलं तरी लोकं मला शिकवतात. असं म्हणताच भरसभेत हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
राजगुरुनगरमध्ये सभा सुरू असताना बाबा राक्षे हे अजित पवार यांच्याजवळ व्यासपीठावर गेले आणि त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजित पवार मिश्किलपणे भाष्य करत म्हणाले की, “होय होय बाबा होय. आता हा मला शिकवायला चाललाय, आता असं बोला, आता तसं बोला. माझं पार टक्कल पडलंय ना. तरी लोक मला शिकवतायेत. आता काय करू या बाबाला. बाबा लोक अशीच असतात. सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं. आता कुठल्या बाबा लोकांचं ऐकावं लागतं, याचा विचार तुम्ही करा”, असं मिश्किलपणे अजित पवार यांनी म्हटलं आहे.त मोठा हशा पिकला.
म्हाडासारख्या संस्थेच्या माध्यमातून पक्की घरं उपलब्ध करून देणार
राजगुरूनगरमध्ये विकास साधण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणारा निधी याठिकाणी योग्य पद्धतीनं कसा वापरायचा, त्यासाठी आम्ही आणि आमचे सर्व उमेदवार सक्षम आहेत. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजना व सीएसआर फंडच्या माध्यमातून देखील निधी विकास कामांकरिता याठिकाणी आणता येईल. याशिवाय भूमिहीनांना म्हाडासारख्या संस्थेच्या माध्यमातून पक्की घरं उपलब्ध करून देणं, अशी कामं आम्ही सुरू केलेली असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले.
आगामी निवडणुकीमध्ये मतदान कोणाला करायचं, हा निर्णय तुमच्या हातात
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेनं आम्ही पुढे चाललो आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढत असताना या राजगुरुनगरमध्ये सुद्धा विकास झाला पाहिजे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानानं मतदानाचा अधिकार आपल्या सर्वांना दिलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मतदार राजा आहे. आगामी निवडणुकीमध्ये मतदान कोणाला करायचं, हा निर्णय तुमच्या हातात असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.