उजनीतील बेकायदा जलवाहतूक ठरली दुर्घटनेला कारणीभूत; शॉर्टकट जिवावर बेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 03:07 PM2024-05-22T15:07:19+5:302024-05-22T15:09:16+5:30

उजनीतील जलाशयात एकाच कुटुंबातील ४ जण आणि २ बोट चालक असे ६ जण बुडाले असून त्यांचा अजूनही शोध सुरु आहे

Illegal shipping in Ujni was the cause of the accident; Shortcut is dead | उजनीतील बेकायदा जलवाहतूक ठरली दुर्घटनेला कारणीभूत; शॉर्टकट जिवावर बेतला

उजनीतील बेकायदा जलवाहतूक ठरली दुर्घटनेला कारणीभूत; शॉर्टकट जिवावर बेतला

बाभुळगाव : उजनी धरणाच्या जलाशयात काल बोट उलटून झालेल्या अपघाताला राजरोसपणे सुरू असलेली बेकायदा जलवाहतूक कारणीभूत ठरली असून यापूर्वीही अशा रीतीने दुर्घटना घडून दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर कडाक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. करमाळा तालुका आणि इंदापूर तालुका यांच्या मध्ये भीमा नदी असून यावरच उजनी धरण बांधण्यात आले आहे. यामुळे या परिसरात धरणाच्या जलसाठ्यामुळे अथांग पाणी पसरले आहे . 
   
करमाळ्यातून इंदापूर कडे जाण्यासाठी गावागावातून पलिकडच्या तिराला जाण्यासाठी बेकायदा जल वाहतूक राजरोस पणे सुरू असते. अशा बोटींवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने नसल्याने हा सर्व प्रवास जीवावर बेतनारा असतो. यापूर्वीही अशा पद्धतीने बोटीतून पाण्यात गेल्यावर अनेक दुर्घटना घडल्या आहेत. तरीही प्रशासन या धोकादायक प्रवासाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असते . 

करमाळा येथून इंदापूर कडे रोड मार्गे प्रवास करण्यासाठी शंभर किलोमीटरचा वळसा मारावा लागतो. यासाठी तीन तासापेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र बोटीतून केवळ पाच ते सात किलोमीटर पाण्यातून हा धोकादायक प्रवास केल्यावर तासाभरात पलिकडच्या इंदापूर तालुक्यात जाता येते. हाच शॉर्टकट जीवावर बेतू शकतो याचा विचार ना बोट वाले करतात, ना यातून प्रवास करणारे प्रवासी, त्यामुळे अशा दुर्घटना सातत्याने घडत असतात. दुर्घटना झाल्यावर अलर्ट मोडवर आलेले प्रशासन पुन्हा या जलवाहतूक कडे दुर्लक्ष करते आणि पुन्हा नवीन दुर्घटना समोर येते. 

या बेकायदा बोटींवर ना लाईफ जॅकेट असतात, ना बोट बुडायला लागली तर प्रवाशांना वाचवण्याची उपकरणे असतात. बोट चालक देखील पुरेसा प्रशिक्षित नसल्याने दुर्घटने वेळी त्यालाही जीव वाचवत येत नाही. असाच प्रकार काल कुगव ते कळाशी या दरम्यान घडला आणि बोटीतून सहा जणांचा शोध वीस तासानंतर देखील लागू शकलेला नाही . 

काल उजनी धरणात बुडालेले सर्व सहा जण करमाळा तालुक्यातील कूगाव व झरे या गावातील असून या परिसरावर कालपासून शोककळा पसरली आहे .  करमाळा तालुक्यातील झरे गावातील गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) व गौरव डोंगरे (वय १६), अशी बोट उलटून बुडालेल्यांची नावे आहेत. त्यांचा शोध अजूनही सुरु आहे. काल रात्रीपासून कुगाव् व झरे गावातील गावकरी मोठ्या संख्येने दोन्ही तीरावर गोळा झाले आहेत. भीमा नदीच्या किनाऱ्यावर येऊन बसले आहेत. झरे गावात काल रात्रीपासून शोककळा पसरली आहे. गावात सकाळपासून संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण असून प्रत्येकाला चमत्कार होण्याची अपेक्षा आहे. एनडीआरएफच्या टीम कडून सकाळी पासून युद्ध पातळीवर शोध सुरू आहे. मात्र अद्यापही एकाच देखील शोध लागलेला नाही.

 झरे गावात गोकुळ दत्तात्रय जाधव हे आई, वडील, भाऊ,दोन बहिणी सोबत लहानाचे राहतात. काही वर्षांपूर्वी गोकुळचे लग्न कोमल यांच्या सोबत झाले होते. गोकुळ जाधव हे प्लम्बिंगचे काम करत आपली उपजीविका चालवत असे. आपल्या पाहुण्याच्या घरी जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी गोकुळ जाधव व त्यांची पत्नी कोमल, दोन चिमुकले हे काल संध्याकाळी कूगाव येथून दुपारी कळाशी कडे निघाले होते. यावेळी अचानक सुरू झालेल्या या वादळी वाऱ्यात ही बोट उलटली आणि गोकुळ जाधव, कोमल जाधव आणि दोन्ही चिमुकले भीमा नदीच्या पात्रात बुडाले.

Web Title: Illegal shipping in Ujni was the cause of the accident; Shortcut is dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.