जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:12 IST2025-10-25T13:11:11+5:302025-10-25T13:12:04+5:30
शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या लढ्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने सहभागी होऊ नये

जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
पुणे: शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या (जैन बोर्डिंग) कागदपत्रातून मंदिर गायब केले. असा कोणता विकास साध्य करण्याचे आपण प्रयत्न करीत आहात, तुम्हाला धर्माचा नाश करायचा आहे. तुम्ही मंदिर विकले. हे ट्रस्टचे कर्तव्य आहेत का ? असे खडे बोल जैन मुनी आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी ट्रस्टी जयंत नांदुरकर यांना सुनावले. यावेळी त्यांनी या कारस्थानात सहभागी असलेल्या सर्वांचा विनाश होईल, असा संतापही व्यक्त केला.
शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट ही १९५८ मध्ये स्थापन झालेली सार्वजनिक धर्मादाय संस्था असून संस्थेच्या ताब्यात मॉडेल कॉलनी येथील सुमारे १२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा (तीन एकर) भूखंड आहे. या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग व श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर अस्तित्वात आहे. मात्र, ट्रस्टच्या संपत्तीबाबत काही विश्वस्त, राजकीय नेते, बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी संगनमत करून २३० कोटींना जमिनीचा व्यवहार केला आहे. ही जागा गोखले डेव्हलपर्सला विकल्याचे उजेडात आले आहे.
विश्वस्तांच्या या निर्णयाविरोधात एकत्र येत जैन समाजबांधवांनी जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या माध्यमातून शुक्रवारी (दि. १७) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या जागेचा वादग्रस्त व्यवहार येत्या पंधरा दिवसांत रद्द करावा, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी दिला होता.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टी जयंत नांदुरकर हे शुक्रवारी बोर्डिंगचे रेक्टर सुरेंद्र गांधी यांच्या कार्यालयात आले होते. ही बाब आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज आणि जैन बांधवांना समजल्यानंतर सर्वजण गांधी यांच्या कार्यालयाकडे गेले आणि त्यांनी नांदुरकर व गांधी यांना घेराव घातला. यावेळी आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी नांदुरकर यांना चांगलेच खडे बोल सुनावले.
आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज म्हणाले, ट्रस्टच्या कागदपत्रातून मंदिर गायब करून असा कोणता विकास साध्य करण्याचे प्रयत्न आपण करीत आहात. तुम्हाला धर्माचा नाश करायचा आहे, तुम्ही मंदिर विकले. हे ट्रस्टचे कर्तव्य आहेत का? ज्या व्यक्तीने जागा दान दिली, ती विकण्याचा अधिकार आपल्याला आहे का? ज्या व्यक्तीने ही जागा धर्मकार्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिली, त्याने स्पष्ट लिहिले आहे की, ही जागा विक्री करता येणार नाही. असे असताना देखील ट्रस्टी जागा विक्री कशी करू शकतात. जैन बोर्डिंग व मंदिराच्या जागा विक्रीमध्ये सहभागी असलेले शासक, प्रशासक तसेच या कारस्थानात सहभागी असलेल्या सर्वांचा विनाश होईल, असा संतापही महाराजांनी व्यक्त केला.
एक तारखेच्या अगोदर हा व्यवहार रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन होईल, याची ट्रस्टीने दखल घ्यावी, असा इशाराही आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी यावेळी दिला. समाजाला विश्वासात घेणारे विश्वस्त समजले जातात, समाजाला धोका देणारे विश्वस्त समजले जात नाहीत, असेही ते म्हणाले.
शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या लढ्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने सहभागी होऊ नये. आमचा लढा हा कुठल्याही राजकीय पक्षाशी नसून जैन समाजाची धरोहर आणि जागा ज्या सिद्धांतानी घेतली आहे, तो सिद्धांत आणि जागा वाचवण्यासाठी आहे. उलट, ज्या कोणाला यामध्ये मदत करायची असेल त्यांचे स्वागतच आहे. त्यांनी पक्षाचे, संघटनेचे जोडे बाहेर ठेवून समाजाच्या व्यासपीठावर येऊन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढावे, ही नम्र विनंती. - लक्ष्मीकांत खाबिया, जैन समाजाचे कार्यकर्ते.