दोन्ही गट एकत्र आल्यास काही काळासाठी राजकारण सोडणार; शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:45 IST2025-12-01T15:45:12+5:302025-12-01T15:45:56+5:30
समविचारी पक्षासोबत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर आघाडी करण्यात काहीच गैर नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकाने सांगितले

दोन्ही गट एकत्र आल्यास काही काळासाठी राजकारण सोडणार; शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांची भूमिका
पुणे: पुणे महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४२ नगरसेवक भाजपच्या विरोधातच निवडून आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी या पक्षांच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी भूमिका मांडली जात आहे; पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आल्यास काही काळासाठी राजकारण सोडणार, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडली आहे. भाजपविरोधात निवडणूक लढण्याची पक्षाची भूमिका असून, त्यासाठी समविचारी पक्षासोबत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर आघाडी करण्यात काहीच गैर नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी सांगितले. त्यामुळे पालिका निवडणूक एकत्र लढण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दुफळी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे महापालिका भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सूतोवाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केले आहे. भाजपने निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. पुणे महापालिकेची निवडणूक प्रामुख्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच अशी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीसोबत लढणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यावे, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची अपेक्षा व्यक्त करत आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. मात्र, आता पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र झाल्यास अनेकांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागणार आहे.
भाजप विरोधात लढाई, समविचारी पक्षाबरोबर आघाडी करण्यात गैर नाही
महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात लढण्याची पक्षाची भूमिका असून, त्यासाठी समविचारी पक्षासोबत आघाडी करण्यात काहीच गैर नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर आघाडी करण्याबरोबर पक्षांतर्गत चर्चा करावी. त्याचा अहवाल पक्षाच्या प्रदेशाध्यक्षासह वरिष्ठ नेत्यांकडे पाठवावा. त्याबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतली तो मान्य असेल. २०१७ साली पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचे ४२ नगरसेवक निवडून आले होते. ते सर्व भाजपच्या विरोधात निवडून आले होते. त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार दोन नंबरवर होते. पालिका निवडणुकीत लढाई भाजप विरोधात आहे.- विशाल तांबे, माजी अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका
तर काही काळासाठी राजकारण सोडेन
महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. काल, परवा आणि उद्यादेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आमचा कोणताही द्वेष नव्हता आणि नसेल; पण आमचा विषय हा पुरोगामी चळवळ आणि पुणे शहराचा विकास हाच आहे; पण शहर पातळीवर जर एखाद्या कोणाला वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर युती करावी तर त्यांचे ऐकायचं की नाही, याचा निर्णय आमच्या पक्षाचे वरिष्ठ घेतील. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवर मला विश्वास आहे; पण तरीही जर अशा प्रकारचा निर्णय घेतला तर मी माझं राजकारण काही काळासाठी थांबविणार आहे.- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष