“आरोपीला फाशी मिळेपर्यंत तुमच्या सोबत...”; कुटुंबीयांची भेट घेत अमितेश कुमार यांनी दिला धीर
By किरण शिंदे | Updated: May 4, 2026 21:34 IST2026-05-04T21:34:12+5:302026-05-04T21:34:57+5:30
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला.

“आरोपीला फाशी मिळेपर्यंत तुमच्या सोबत...”; कुटुंबीयांची भेट घेत अमितेश कुमार यांनी दिला धीर
किरण शिंदे, पुणे: नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार व हत्येच्या संतापजनक प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली असताना, पुणे पोलिसांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन वडिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत, “आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत मी तुमच्या सोबत राहणार आहे. तुम्हाला कधीही काही सांगायचे असेल, मदत हवी असेल तर मी स्वतः तुमच्या घरी येईन,” असे आश्वासन दिले.
भोर तालुक्यातील नसरापूर येथे १ मे रोजी साडेतीन वर्षीय चिमुरडीवर भिमराव कांबळे (६५) या आरोपीने लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची भावना व्यक्त होत असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शनिवारी (२ मे) नवले पूल परिसरात सुमारे साडेचार तास रास्ता रोको आंदोलन करत निषेध नोंदवला. “आरोपीला तात्काळ फाशी द्या” अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या प्रकरणाचा जलदगतीने निकाल लागावा यासाठी पोलिस आयुक्तांनी महत्त्वाची घोषणा केली. या खटल्यासाठी लवकरच विशेष सरकारी वकील नियुक्त केला जाणार असून, तपास आणि न्यायप्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. असे अमितेश कुमार यांनी यावेळी मयत चिमुकलीच्या कुटुंबीयांना सांगितले.