‘मोठा हो आणि जयंत नारळीकर हो...’ हा आशीर्वाद मला मिळाला होता - रघुनाथ माशेलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 11:36 IST2025-05-21T11:36:27+5:302025-05-21T11:36:58+5:30

सामान्य माणसांमध्ये शास्त्रज्ञ कसा असावा? आणि कसा व्हावा? याचा जयंत नारळीकर हे एक मापदंड होते

I was blessed with the blessing of 'Grow up and become Jayant Narlikar...' - Raghunath Mashelkar | ‘मोठा हो आणि जयंत नारळीकर हो...’ हा आशीर्वाद मला मिळाला होता - रघुनाथ माशेलकर

‘मोठा हो आणि जयंत नारळीकर हो...’ हा आशीर्वाद मला मिळाला होता - रघुनाथ माशेलकर

पुणे: मी पन्नास वर्षांपूर्वी भारतात आलो. तेव्हा ताराताई बोले यांना मी खूप मानायचो. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो, त्यावेळी ‘खूप मोठा हो आणि जयंत नारळीकर हो...’ असा आशीर्वाद त्यांनी दिला होता. याचा अर्थ असा की, सामान्य माणसांमध्ये शास्त्रज्ञ कसा असावा? आणि कसा व्हावा? याचा जयंत नारळीकर हे एक मापदंड होते. त्यांनतर काही वर्षांनी एच. के. फिरोदिया पुरस्काराचा चेअरमन असल्याने पुरस्कारासाठी डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाची निवड केली होती. त्यांचे सायटेशनपण मीच लिहिले होते. त्यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मलाच बोलावले होते. माझ्या हस्ते डॉ. नारळीकरांना पुरस्कार देण्यात आला. तेव्हा गमतीने सांगताना ताराताई बोले यांनी त्यांच्यासारखी उंची गाठ हे सांगितले होते. त्यांची उंची गाठली नाही; पण माझ्या हस्ते नारळीकरांना पुरस्कार देऊ शकलो, हे पाहायला आज त्या असत्या तर त्यांना नक्कीच आनंद झाला असता, अशा शब्दांत जयंत नारळीकर यांच्याबद्दलच्या आठवणींना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी उजाळा दिला.

डॉ. माशेलकर म्हणाले, डॉ. नारळीकर आणि माझे संबंध अगदी जवळचे होते. आमची पहिल्यांदा भेट झाली ती पहिल्या विज्ञान कमिटीमध्ये १९८४ ते ८९ त्यात आम्ही दोघेपण त्या कमिटीचे सदस्य होतो. त्यामुळे विज्ञान पॉलिसी कशी असावी, मुलांमध्ये विज्ञानाची गोडी कशी निर्माण व्हावी, मूलभूत संशोधन किती महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टी त्यांच्याकडून शिकता आल्या. त्यांच्यामुळे मुलांमध्ये विज्ञानविषयक गोडी निर्माण झाली आणि विज्ञानाकडे न वळणारी मुलेदेखील अधिकाधिक विज्ञानाकडे वळली, हे त्यांचं वैशिष्ट्य.

दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्या मुलीने निर्मित केलेला एक लघुपट मला पाठवला. त्यात त्यांनी अनेक वैज्ञानिकांचे कर्तृत्व दाखवले. त्यात शेवटी माझा आणि जयंत नारळीकर यांचा फोटो दाखवला. तो बघितल्यावर मी म्हणालो की, खूप दिवस झाले बाबांना भेटलो नाही. तर ते म्हणाले की, लवकर येऊन भेटा; पण ती भेट अशी होईल असं वाटलं नव्हतं. खूप वाईट वाटलं; मात्र आमची भेट मात्र अपूर्ण राहिली अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: I was blessed with the blessing of 'Grow up and become Jayant Narlikar...' - Raghunath Mashelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.