Ajit Pawar: पैशांचे सोगं आणता येत नाही हे मी वेगळ्या उद्देशाने बोललो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:54 IST2025-09-26T18:54:25+5:302025-09-26T18:54:49+5:30
मी ग्रामीण भागामध्ये गेल्यावर त्यांना समजण्यासाठी असे बोलत असतो. विरोधक कारण नसताना गैरसमज निर्माण करतात

Ajit Pawar: पैशांचे सोगं आणता येत नाही हे मी वेगळ्या उद्देशाने बोललो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खुलासा
पुणे : पैशांचे सोगं आणता येत नाही हे मी वेगळ्या उद्देशाने बोललो होतो. हा शब्द मी अनेकवेळा वापरतो. मदत करताना ती नियोजनात बसवावी लागते. अशा नैसर्गिक संकटात मदत करण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, असा विश्वास देण्यासाठीच मी बोललो, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. दरम्यान घरांच्या नुकसानीपोटी ५ हजार आणि १० किलो धान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. धान्यात वाढ करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर संतापलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पैशांचे सोंग आणता येत नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर वाद निर्माण झाल्यानंतर पवार यांनी खुलासा करत असा शब्द मी वेगळ्या उद्देशाने बोलल्याचा दावा केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “मी ग्रामीण भागामध्ये गेल्यावर त्यांना समजण्यासाठी असे बोलत असतो. विरोधक कारण नसताना गैरसमज निर्माण करतात. मी तो शब्द बऱ्याचदा वापरतो. आपण पण घरात वापरतो अरे बाबांनो सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग नाही करता येत. त्यावर पैशांच्या नियोजनामध्ये या बाबी बसवाव्या लागतात. पण ते वेगळ्या उद्देशाने बोललो. अशा प्रकारची नैसर्गिक संकटे येतात त्यावेळी राज्य सरकार ताकदीने अडचणीत असणाऱ्या शेतकरी, नागरिक, ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहत असते. ते उभे राहतील असा विश्वास मी त्यांना दिला. मी बोललो त्याच्या पुढचे आणि मागचे विचारात घेतले जात नाही.”
मी काल रात्रीपर्यंत नुकसानीची पाहणी करत होतो. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोचविण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात आली. ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना तातडीने पाच हजार रुपये आणि पाच किलो प्रत्येकी गहू आणि तांदूळ असे दहा किलो धान्य देण्याचा निर्णय घेताल आहे. परंतु या नागरिकांच्या घरातील धान्य भिन्न भिजले आहे, तसेच खराब झाले आहे. हे दहा किलो धान्य पुरणार नाही. ते वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करू. नागरिकांना चांगला निवारा मिळण्यासाठी शाळा किंवा कार्यालयांमध्ये हलविण्याचा विचार आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून मदत मिळावी यासाठी पत्र दिले आहे. हिमाचल प्रदेश आणि पंजाबला अशी मदत मिळाली आहे, काल गृहमंत्री अमित शहा यांना सगळी माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा मदतीचे पत्र देणार आहोत, असेही ते म्हणाले. पुढील तीन ते चार दिवसांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. राज्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन संस्थांना आणि यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले. ओला दुष्काळ ही संकल्पना काही लोकांना माहिती नाही. त्यांना प्रश्न विचारायचा संविधानाने अधिकार दिला आहे. काही लोक यातून बदनामी होईल असा प्रयत्न करतात, असेही ते म्हणाले.