असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 14:03 IST2025-05-22T14:02:28+5:302025-05-22T14:03:44+5:30
Vaishnavi Hagawane Death Case जर अजित पवार दोषी असतील तर फासावर लटकवा, माझा त्यात काय संबंध असेल तर कारवाई करा, उगाच बदनामी केली जात आहे

असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
बारामती: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र हगवणे फरार आहे. राजेंद्र हगवणे अजित पवार गटाचा सभासद होता. अजित पवार हे हगवणे कुटुंबीयांच्या लग्नाला गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका सुरु झाली होती. त्यानावरून अजित पवारांनी भाष्य केलं आहे. असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार असल्याचे अजित पवारांनी बारामतीत बोलताना सांगितले आहे.
अजित पवार म्हणाले, मी ही घटना घडल्याची माहिती कळल्यावर पिंपरीच्या सीपींना फोन केला. आणि सांगितलं की, कोणी का असेना कारवाई करा. ज्या मुलीने आत्महत्या केली, तिचा नवरा, सासू, नणंद सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. सासरा पळून गेला. तो पण सापडेल, पळून पळून जातो कुठं? असं म्हणत राजेंद्र हगवणे याला इशारा दिला आहे.
प्रेमापोटी लोक बोलावत असतात, तिथं जावं लागतं
तुम्ही अनेक जण मला लग्नाला बोलावत आहात. मी शक्य असेल तर येण्याचा प्रयत्न करतो. मी एखाद्या लग्नाला गेलो आणि नंतर त्यांनी त्याच्या सुनेसोबत वेडेवाकडं केलं, तर त्यात अजित पवारचा काय संबंध आहे. जर अजित पवार दोषी असतील तर फासावर लटकवा. माझा त्यात काय संबंध असेल तर कारवाई करा. उगाच बदनामी केली जात आहे. मला सांगितले गाडीची चावी द्यायला सांगितली. मी देता ना पण विचारले. स्वखुशीने देत आहात की जबरदस्तीने देत आहात. मग माझी का बदनामी करता? प्रेमापोटी लोक बोलावत असतात. तिथं जावं लागतं, नाही गेलं तर माणसं रूसतात, लग्नाला गेलो म्हणून आम्ही सांगतो का सूनेशी असं वागा म्हणून असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत
माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असली लोकं माझ्या पक्षात नकोत. बहुतेक त्यांचे लव्ह मॅरेज आहे. माझा तिथे काही संबंध नाही. मी फक्त लग्नाला गेलो. जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पथक नेमली आहेत. माणुसकी म्हणून जबाबदारी म्हणून जे काही करायचं आहे ते आम्ही केलं आहे. असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत. फक्त लग्नाला गेलो म्हणून माझी बदनामी केली. या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. दोघं फरार आहेत. शोधासाठी आणखी पथके वाढवायला सांगितली आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.