तू मला पसंत नव्हतीस, घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून लग्न केले, पतीकडून पत्नीचा मानसिक छळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:31 IST2025-09-26T18:30:45+5:302025-09-26T18:31:23+5:30
हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून नववधूस ४५ दिवसांत घराबाहेर काढणाऱ्या सासरच्यांनी सुनेस एकरकमी ४५ लाख रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शविली आहे

तू मला पसंत नव्हतीस, घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून लग्न केले, पतीकडून पत्नीचा मानसिक छळ
पुणे : तू मला पसंत नव्हतीस, मला लग्न करायचे नव्हते, घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून मी लग्न केले, असे सातत्याने बोलून नववधूचा मानसिक छळ केला. त्याबरोबरच हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून नववधूस ४५ दिवसांत घराबाहेर काढणाऱ्या सासरच्यांनी सुनेस एकरकमी ४५ लाख रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शविली आहे. पत्नीनेही सासरच्यांविरोधातील कौटुंबिक हिंसाचारानुसार दाखल केलेला गुन्हा मागे घेतला. त्यानंतर, दाम्पत्याने परस्पर संमतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला अन् कौटुंबिक हिंसाचारासह घटस्फोटाचा दावा अवघ्या एक वर्षात निकाली निघाला.
राकेश आणि स्मिता (दोघांची नावे बदलेली आहेत) यांचा विवाह २९ जानेवारी २०२२ रोजी झाला. लग्नाच्या काही दिवसांनंतर लग्नात हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून सासू, सासरा व नणंदेकडून विवाहितेचा छळ सुरू झाला. आरोपींनी विवाहितेस घराबाहेर काढले. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी ती परत नांदण्यास आली असता तिला घरात घेतले नाही. राकेश यानेही फोन घेणे व भेटण्यास टाळले. यादरम्यान, सासऱ्यांनी संपर्क साधत मुलाला दुसरे लग्न करायचे आहे, तुला नांदवायचे नाही, तू घटस्फोट दे म्हणून मानसिक त्रास दिला. याप्रकरणी, तिने भोसरी पोलिस ठाण्यात सासरच्यांविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तपासानंतर, आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. याप्रकरणात, पत्नीतर्फे ॲड. प्रियंका काटकर आणि ॲड. रेश्मा सोनार यांनी काम पाहिले. समुपदेशानादरम्यान पतीने एकरकमी ४५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यास पत्नीनेही होकार दर्शवित कौटुंबिक हिंसाचारानुसार दाखल गुन्हा मागे घेण्याची तयारी दर्शविली. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. तो न्यायालयाने मंजूर केला.