सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान घसरण्याला आंदाेलने कारणीभूत - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 17:18 IST2025-09-29T17:15:45+5:302025-09-29T17:18:08+5:30
विद्यार्थी, प्रश्न, आंदोलन या विरोधात मी नाही, पण आंदोलनांचे स्वरूप कसे असावे, समन्वयाने प्रश्न सोडवता येतील का, याचा विद्यापीठानेही प्रयत्न करावा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान घसरण्याला आंदाेलने कारणीभूत - चंद्रकांत पाटील
पुणे: सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठाचा १२६ वा पदवीप्रदान समारंभ साेमवारी (दि. २९) सकाळी इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात पार पडला. या साेहळ्यास प्रमुख पाहुणे हाेते उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि नॅक कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते. मंत्री महादयांना लवकर जायचे असल्याने एका विद्यार्थ्याचा प्रातिनिधिक सत्कार त्यांच्या हस्ते झाला आणि मंत्री महाेदय बाेलायला उभे राहिले. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (एनआयआरएफ) विद्यापीठाचे स्थान घसरण्याला आंदाेलने कारणीभूत असल्याचे सांगून सर्व खापर विद्यापीठावरच फाेडले. प्राध्यापक भरती हाेईल, पैशांची कमी पडू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या साेहळ्यातून विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील ९८,८२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यापैकी ७८ हजार ६०९ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, १९ हजार ५७७ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, २७० विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र, २५९ विद्यार्थ्यांना पीएचडी, तर १०३ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी पदविका प्रमाणपत्र आणि ३ विद्यार्थ्यांना एम.फिलचे प्रमाणपत्र मिळाले. यात विविध विद्याशाखांमधील गुणवंत ५४ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ८९ सुवर्णपदके प्रदान करण्यात आले. विज्ञान शाखेला सर्वाधिक ३० सुवर्णपदके मिळाली.
या साेहळ्यास कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र - कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्र - कुलसचिव ज्योती भाकरे, परीक्षा विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर देसाई यांच्यासह सिनेट सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठ वार्ता अंकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. कुलगुरूंनी ‘सत्य बोला, सदाचाराने वागा’ असा उपदेश दिला.
विद्या हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून, समाज परिवर्तनाचे शस्त्र आहे. त्याचा वापर याेग्य कारणांसाठी करावा, केवळ कपाटात ठेवण्यासाठी पीएचडी थेसिस करू नका, असा सल्लाही मंत्री पाटील यांनी दिला. येत्या महिन्याभरात प्राध्यापक भरती प्रक्रिया मार्गी लागेल, असेही त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. गोसावी यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला. पदवी ही केवळ ज्ञानाची खात्री नाही, तर जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यासाठीची तयारी आहे. पदवी ही नेतृत्त्व क्षमतेला जागतिक स्तरावर सिद्ध करण्याची सुरुवात आहे. त्यामुळे ज्ञानाचा उपयोग जागतिक पातळीवर योगदान देण्यासाठी करा, असेही त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, जागतिक स्तरावर विद्यापीठाची क्रमवारी उंचावली, देशपातळीवर खाली गेली. दोन्हीकडे मूल्यांकनाचे निकष वेगळे आहेत. समाजमाध्यमांतून मानांकन वाढल्याचे कौतुक नाही, पण मानांकन खाली आल्यावर शोधून शोधून टीका केली जाते. हा समाजमाध्यमाचा स्वभाव आहे. पण निंदकाचे घर असावे शेजारी. क्रमवारीबाबत मुख्यमंत्रीही चिंतेत पडले. विद्यार्थी, प्रश्न, आंदोलन या विरोधात मी नाही. पण आंदोलनांचे स्वरूप कसे असावे, समन्वयाने प्रश्न सोडवता येतील का, याचा विद्यापीठानेही प्रयत्न करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कधी आंदोलने झालीच नाहीत. याचे कारण रयतेला काय हवे आहे हे त्यांना आधीच कळायचे. तसेच समाजमाध्यमातून देशभर, जगभर काय संदेश जातो याचाही विचार केला पाहिजे.