"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 20:02 IST2025-10-31T20:01:03+5:302025-10-31T20:02:11+5:30
Ajit Pawar Statement on farmer loan waiver: राज्य सरकारने ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी करू असे जाहीर केले आहे. जाहीर करून २४ तास होत नाही, तोच अजित पवारांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावलं.

"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
Ajit Pawar Latest News: "शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यावर तुम्हीपण वेळच्या वेळी पैसे फेडायची सवय लावा ना. सारखंच फुकटात, सारखंच फुकटात आणि सारखंच माफ, सारखंच माफ; कसं व्हायचं? असे म्हणत अजित पवारांनी कर्जमाफीच्या मागणीवरून शेतकऱ्यांना सुनावले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखाच्या ६४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी सातत्याने शेतकरी कर्जमाफी करण्यावरून नाराजी व्यक्त केली.
अजित पवार म्हणाले, "खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही सवलती देतोय. योजना देतोय. हे सगळं देताना एक लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम लागते. आम्ही जाहीरनाम्यात लिहिलं होतं. शेवटी आम्हाला करता येईना. काल या नेते मंडळींना, बच्चू कडू, राज शेट्टी, अजित नवले खूप जण आम्ही बसलो होतो. आम्ही चर्चा करून तो निर्णय ३० जूनला घ्यायचं ठरवलं. किती एकरपर्यंत द्यायची ते आम्ही तुम्हाला एप्रिलमध्ये सांगू", अशी माहिती त्यांनी दिली.
'सारखेच फुकटात, सारखीच कर्जमाफी; असे चालत नाही'
"तुम्हीपण शून्य टक्के व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळी पैसे फेडायची सवय लावा ना. सारखंच फुकटात, सारखंच फुकटात आणि सारखंच माफ, सारखंच माफ, कसं व्हायचं? असं नाही चालत", अशा शब्दात अजित पवारांनी कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना सुनावले.
"एकदा साहेबांनी (शरद पवार) कर्जमाफी केली. एकदा देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी केली. एकदा आम्ही उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये केली. आता आम्हाला पुन्हा निवडून यायचं होतं, आम्ही सांगितलं की आम्ही कर्जमाफी करू. करा माफ. लोक काय म्हणतात, तुम्ही सांगितलं ना, मग करा. जो शब्द दिला, ते करताना आज काही हजार कोटी रुपये त्याला लागणार आहेत", असे म्हणत अजित पवारांनी मित्रपक्षांनाही अप्रत्यक्षपणे सुनावले.
"जितकी मदत करायला पाहिजे, तितकी करेन; पण सारखीच मदत नाही. काही तुम्हीपण हातपाय हलवा", असे अजित पवार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही म्हणाले.