‘झुंडशाही’ला चाप साध्या वेशातील पोलिसांचा

By Admin | Updated: July 5, 2014 06:08 IST2014-07-05T06:08:30+5:302014-07-05T06:08:30+5:30

रेल्वेच्या सिझन तिकिटाच्या बोगीमध्ये जुन्या पासधारकांकडून सुरू असलेल्या झुंडशाहीला रोख लावण्यासाठी पुणे ते मुंबई या मार्गांवर धावणाऱ्या साध्या वेशातील पोलिसांची पथके अचानकपणे पाठविण्यात येणार.

The 'Hierarchy' of the simple folk police | ‘झुंडशाही’ला चाप साध्या वेशातील पोलिसांचा

‘झुंडशाही’ला चाप साध्या वेशातील पोलिसांचा

पुणे : रेल्वेच्या सिझन तिकिटाच्या बोगीमध्ये जुन्या पासधारकांकडून सुरू असलेल्या झुंडशाहीला रोख लावण्यासाठी पुणे ते मुंबई या मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांमध्ये साध्या वेशातील पोलिसांची पथके अचानकपणे पाठविण्यात येणार आहेत. त्या वेळी अरेरावी करताना आढळून येणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच, या प्रकारांची सखोल चौकशी रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.
सिझन तिकीट बोगीमध्ये जुन्या पासधारकांकडून नवीन पासधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये उजेडात आले. त्याचा सविस्तर वृत्तांत शुक्रवारी प्रकाशित होताच रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. त्याचबरोबर पासधारकांच्या मनमानीला तोंड द्यावे लागत असलेल्या अनेक प्रवाशांनी ‘लोकमत’ कार्यालयामध्ये फोन करून त्यांच्या व्यथा मांडल्या.
पासधारकांच्या डब्यामध्ये झुंडीने एकत्र येऊन जुने पासधारक नवीन पासधारकांना सिटवर बसण्यास मज्जाव करतात. त्या त्यांच्या नेहमीच्या जागा असल्याचे सांगून उठविले जाते. त्याला विरोध करणाऱ्यास प्रसंगी शिवीगाळ व मारहाण केली जाते. याबाबत पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अभय परमार यांनी सांगितले, ‘‘अचानकपणे साध्या वेशातील पोलिसांची पथके पासधारकांच्या डब्यात पाठविली जातील. त्या वेळी अरेरावी करताना आढळून येणाऱ्या पासधारकांवर कडक कारवाई केली जाईल. रेल्वेच्या टीसीलाही जर शिवीगाळ केली जात असल्यास त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवावी.’’
वाणिज्य प्रबंधक के. के. मिश्रा यांनी सांगितले, ‘‘जमावाच्या अरेरावीला तोंड देणे एकट्या टीसीला शक्य होत नाही. रेल्वे सुरक्षा दलाची मदत घेतली
तरी त्यांना फौजदारी अधिकार
नसल्याने त्यांच्या कारवाईला मर्यादा
येतात. त्यामुळे रेल्वे पोलीस त्यांच्यावर प्रभावी कारवाई करू शकतील. त्यामुळे याकरिता रेल्वे मदत घेऊ, तसेच तिकीट तपासून अचानकपणे त्या बोगीला भेट देऊन पाहणी करतील.’’(प्रतिनिधी)

Web Title: The 'Hierarchy' of the simple folk police