पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:31 IST2025-06-13T13:31:05+5:302025-06-13T13:31:34+5:30
घरी जाण्यासाठी रिक्षा करण्याकरिता रस्ता क्रॉस करत असताना कडेला असणाऱ्या नाल्यामध्ये त्या पडल्या आणि वाहून गेल्या

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
पुणे : दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गुरुवारी रात्री शहराला मुसळधार पावसाने झोडपले. दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडेल अशी शक्यताही नसताना अचानक रात्री दहानंतर शहर व परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, पुढील तीन दिवसांसाठी पुणे जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या मुसळधार पावसात ६५ वर्षांच्या ज्येष्ठ महिला वाहून गेल्या आहेत. शोभा मनोहर महिमाने असे वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे.
शोभा या पुण्यात दर्शन पार्क फुरसुंगी येथे राहतात. त्या काल रात्री कोल्हापूर पुणे असा प्रवास करून बेंगलोर हायवेला पुलावर उतरल्या होत्या. घरी जाण्यासाठी रिक्षा करण्याकरिता रस्ता क्रॉस करत असताना कडेला असणाऱ्या नाल्यामध्ये पडल्या. व पाण्यातून वाहून गेल्या आहेत. त्यांची महिलेची चप्पल शोधकार्य सुरु असताना पुला खाली आढळून आली आहे. अग्निशमन केंद्रा शेजारील नाल्या मध्ये पासून पुढे शोधकार्य सुरु आहे.
तब्बल दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे पुण्यात धुवाधार आगमन झाले आहे. सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कात्रज, बिबवेवाडी, स्वारगेट, भंडारकर रस्ता, प्रभात रस्त्यासह मध्यवर्ती पेठेमध्ये मुसळधार पाऊस झाला. रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. अनेक रस्ते जलमय झाले होते. वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालविणे भाग पडत होते. काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता. आज (शुक्रवारी) मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने दिला आहे.