परतीच्या पावसाने इंदापूर तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 19:20 IST2025-09-15T19:20:03+5:302025-09-15T19:20:17+5:30
पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

परतीच्या पावसाने इंदापूर तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी
निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचा चांगलाच फटका बसला आहे. मका, टोमॅटो, शेवगा, पेरू, डाळिंब, भोपळा, कारले आणि पालेभाज्यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे भुईसपाट झाली असून, काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
निमगाव केतकी परिसरातील व्याहळी, कौठळी, कचरवाडी, गोतोंडी, शेळगाव, वरकुटे खुर्द, रामकुंड आदी गावांमध्ये १४ सप्टेंबरच्या रात्री परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली. विशेषतः मुरघासासाठी कापणी करून ठेवलेल्या मक्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भोपळा आणि कारले या पिकांसाठी उभारलेले स्टेजिंग पावसाच्या जोरदार तडाख्याने कोसळले, ज्यामुळे सुमारे दोन एकर क्षेत्रातील पिके नष्ट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कचरवाडी (निमगाव केतकी) येथील शेतकरी परशुराम बरळ म्हणाले, “परतीच्या पावसाने आमचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. शेतात उभी असलेली पिके आणि स्टेजिंग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. दरम्यान, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे यांनी सांगितले, “तालुक्यात परतीचा पाऊस झाला असून, काही गावांमध्ये ओढ्यालगतच्या शेतांमध्ये पाणी साचले आहे. ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे, तिथे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पावले उचलली जातील.” सध्या परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण आहे तर रात्री पावसाचा जोर वाढत आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडून तातडीने आर्थिक मदत आणि पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे.