पुणे: पुण्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला असून, पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरात जोरदार सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. अचानक सुरु झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली आहे. रस्त्यांना पुन्हा एकदा नद्यांचे स्वरूप आल्याचे दिसून आले आहे.
दरवर्षी मे महिन्यात उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत असतो. यंदा मात्र हवामानात बदल झाला असून, मेमध्ये सर्वत्र अवकाळी पाऊस होत आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली होती. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला आहे. पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आठवड्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आणि ५० ते ६० किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. तर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड, तसेच विदर्भातील नागपूर आणि अमरावती येथेही मध्यम पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
अंदमानात मान्सूनचे आगमन
अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन झाले असून, या ठिकाणी सध्या हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमानात वाटचाल करणार आहे. नियोजित वेळेच्या एक आठवडा आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. पुढील काही दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, अंदमान निकोबारसह मध्य बंगालच्या उपसागरात विस्तार करेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानंतर हळूहळू केरळ आणि महाराष्ट्राकडे मान्सून वाटचाल सुरू करण्याची शक्यता आहे.