Maharashtra Temperature: राज्यात उष्णतेची लाट! अकोल्याचा पारा ४४ अंशांवर, पुणे ४०.३, बऱ्याच जिल्ह्यांनी चाळीशी ओलांडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 10:09 IST2025-04-18T10:06:20+5:302025-04-18T10:09:13+5:30
महाराष्ट्रात सोलापूरसह विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, तर मराठवाड्यात औरंगाबाद आणि परभणीने तापमानाची चाळिशी ओलांडली

Maharashtra Temperature: राज्यात उष्णतेची लाट! अकोल्याचा पारा ४४ अंशांवर, पुणे ४०.३, बऱ्याच जिल्ह्यांनी चाळीशी ओलांडली
पुणे: उत्तरेकडून उष्ण वारे येत असल्यामुळे राज्यात किमान तापमानाचा पारा वाढला आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूरसह विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, तर मराठवाड्यात औरंगाबाद आणि परभणीने तापमानाची चाळिशी ओलांडली आहे. राज्यात अकोला येथे ४४.१ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील कमाल तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून, विदर्भात तुरळक पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
एप्रिल महिना सुरू होताच राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीटदेखील झाली होती. मात्र, आता पुन्हा सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. उत्तरेकडून उष्ण वारे येत आहेत. त्यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरणाची शक्यता आहे. पुढील काही दिवस राज्यात उष्णतेचा तडाखा राहणार असल्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
राज्यातील कमाल तापमान पुढीलप्रमाणे
पुणे ४०.३, जळगाव ४२.२, सातारा ४०.७, सोलापूर ४२.८, नाशिक ४०.२, औरंगाबाद ४२.४ , परभणी ४२.१, अमरावती ४२.६, चंद्रपूर ४३, नागपूर ४१.१, वर्धा ४१.५, यवतमाळ ४३.४