दौंडमध्ये पोलिसाचे हृदयद्रावक स्टेटस; फोन बंद करून गायब, वरिष्ठांकडून छळ होत असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 15:03 IST2025-12-06T14:58:54+5:302025-12-06T15:03:50+5:30
यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली १ वर्षा पासुन सतत त्रास देत आहे. माझा नाईलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे

दौंडमध्ये पोलिसाचे हृदयद्रावक स्टेटस; फोन बंद करून गायब, वरिष्ठांकडून छळ होत असल्याचा आरोप
यवत (ता. दौंड): पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या जाचाला कंटाळून यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे यांनी धक्कादायक स्टेटस ठेवून ते बेपत्ता झाल्याने पुणे जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या केडगाव येथील पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे यांनी त्यांच्या मुलीचा फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवत एक भावनिक आणि धक्कादायक पोस्ट टाकली आहे. या स्टेटस पोस्ट मधून त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि पोलीस विभागाच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेल्या १ वर्षापासून सतत त्रास देत आहेत. माझा नाईलाज आहे. मी माझ्या जीवाचे बरेवाईट करुन घेत आहे. दरम्यान पोलीस नाईक रणदिवे हे स्टेटस ठेवल्यापासून त्यांचा मोबाईल बंद असून ते अद्यापपर्यंत मिळून आला नाही. यामुळे पुणे जिल्ह्याच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
निखिल रणदिवे यांची मागील काही दिवसांपूर्वी शिक्रापूर येथे बदली झाली होती, मात्र, यवत पोलीस ठाण्यातून रणदिवे यांना सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावात होते. सध्या त्यांचे कुटुंब देखील शिक्रापूर येथे त्यांनी शिफ्ट केले होते. शुक्रवारी (दि. ५) त्यांनी त्यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप वर स्टेटस ठेवले आहे की, आज तुझा पहिला वाढदिवस पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस नोकरी करतो. तिथे वरिष्ठांची मनमानी चालते. तसेच चार पाच दिवसापूर्वी तू आजारी होती. पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यामुळे तुला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाता आले नाही. यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेल्या १ वर्षापासून सतत त्रास देत आहे. माझा नाईलाज आहे. मी माझ्या जीवाचे बरेवाईट करुन घेत आहे. माझ्याकडून दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा...! केलेल्या कामाची पोच पावती आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली Niks..! हे वरील दोन व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यानंतर रणदिवे यांचा मोबाईल बंद असून पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणामुळे यवत पोलीस ठाण्यात नेमकं चाललंय काय ? पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या कारभारावर पोलीस कर्मचाऱ्याची एवढी नाराजी का? असे प्रश्न उपस्थित होत आहे.