कारागृहातून बाहेर पडला अन् मटका अड्डा सुरू केला; नंदू नाईकसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Updated: May 7, 2025 16:55 IST2025-05-07T16:54:54+5:302025-05-07T16:55:26+5:30
नंदू नाईक याच्याविरुद्ध मटका, तसेच जुगार अड्डा चालवण्याचे ६३ गुन्हे दाखल झाले आहेत

कारागृहातून बाहेर पडला अन् मटका अड्डा सुरू केला; नंदू नाईकसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे: जुगार, मटका अड्डा चालवण्याचे ६३ गुन्हे दाखल असलेला सराईत नंदू उर्फ नंदकुमार नाईक याच्याविरोधात पुणेपोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली होती. गृहविभागाने आठ दिवसात ही कारवाई रद्द केल्यानंतर नागपूर कारागृहातून बाहेर पडलेला नंदू नाईकने पुन्हा मटका अड्डा सुरू केल्याचे उघडकीस आले. खडक पोलिसांनी मटका अड्ड्यावर कारवाई करुन नाईकसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी नंदू नाईक (७०, रा. शाहू चौक, छत्रपती शिवाजी रस्ता, शुक्रवार पेठ), विजय रंगराव शिंदे (६९, रा. शाहू चौक, छत्रपती शिवाजी रस्ता), शंकर सायअण्णा मॅडम (६५, रा. महात्मा फुले पेठ) यांच्यासह एका अल्पवयीनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक आशिष चव्हाण यांनी याबाबत खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू नाईक याच्याविरुद्ध मटका, तसेच जुगार अड्डा चालवण्याचे ६३ गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हेगारी वर्तुळात तो ‘मटका किंग’ नावाने ओळखला जातो. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी पोलिसांनी कारवाई केली होती. त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. महापालिकेेने त्याच्या छत्रपती शिवाजी रस्त्यावरील इमारतीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी कारवाई केली होती. त्याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजूर केला होता. त्यानंतर १७ मार्च रोजी नाईक याला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. नाईक याने ही कारवाई रद्द करण्यासाठी वकिलांमार्फत गृहविभागात प्रयत्न केले. गृहविभागाने ही कारवाई नुकतीच रद्द केली. नाईक कारागृहातून बाहेर पडला आणि त्याने छत्रपती शिवाजी रस्त्यावरील इमारतीत पुन्हा मटका अड्डा सुरू केला. याबाबतची माहिती खडक पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत नाईक याच्यासह साथीदार, तसेच अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोबाइल संच, मटका खेळण्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. पुढील तपास पोलिस हवालदार घोलप करत आहेत.