खेळता खेळता हौदात पडला; ७ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 09:24 AM2024-05-27T09:24:30+5:302024-05-27T09:24:44+5:30

दुर्घटनेस जबाबदार असल्याबद्दल जागा मालक, बांधकाम ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

He fell into the pit while playing A 7-year-old boy drowned an unfortunate incident in Pune | खेळता खेळता हौदात पडला; ७ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

खेळता खेळता हौदात पडला; ७ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

फुरसुंगी : उरुळी देवाची परिसरात रस्त्याच्या कडेला बांधलेल्या हौदात बुडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेस जबाबदार असल्याबद्दल जागा मालक, बांधकाम ठेकेदाराविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे उरुळी देवाची परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्फाज इसाक शेख (वय ७) असे बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याबाबत निसार वाहेदखान पठाण (वय-३२, उरुळी देवाची) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून जयंतीभाई लखीरामभाई सुतार (वय-२९, रा. पिसोळी), महेश बबन कोंडे (वय-३६, रा. उरुळी देवाची) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुतार यांची उरुळी देवाची भागात जागा आहे. त्या ठिकाणी त्यांनी पाण्याचा साठा करण्यासाठी हौद बांधला होता. हा हौद सात फूट खोल असून हौदात सहा फुटापर्यंत पाणी होते. हौद रस्त्यालगत होता. सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्यात आली नव्हती. शेजारीच पठाण कुटुंबीय राहायला आलेले आहेत. पठाण यांचा भाचा अल्फाज तेथे खेळत होता. खेळत खेळत तो हौदात पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अल्फाज बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून, सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.

Web Title: He fell into the pit while playing A 7-year-old boy drowned an unfortunate incident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.