महाराष्ट्रात निम्मे साखर कारखाने बंद; हंगाम लवकर संपणार, आतापर्यंत ७६ लाख टन साखरेचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 10:23 IST2025-03-06T10:23:34+5:302025-03-06T10:23:46+5:30

राज्यात आतापर्यंत ८१४.९२ लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ७६.४३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे

Half of sugar factory closed in Maharashtra The season will end early 76 lakh tonnes of sugar produced so far | महाराष्ट्रात निम्मे साखर कारखाने बंद; हंगाम लवकर संपणार, आतापर्यंत ७६ लाख टन साखरेचे उत्पादन

महाराष्ट्रात निम्मे साखर कारखाने बंद; हंगाम लवकर संपणार, आतापर्यंत ७६ लाख टन साखरेचे उत्पादन

पुणे : कोरडे हवामान आणि अवकाळी पावसाचा अभाव या कारणामुळे यंदाचा साखर हंगाम लवकर संपणार आहे. राज्यात यंदा २०० कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. त्यापैकी आतापर्यंत १०२ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत. राज्यात आतापर्यंत ७६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, साखर उतारा ९.३८ टक्के इतका मिळाला आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक २१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

राज्यात गेल्या वर्षाच्या साखर हंगामाच्या तुलनेत यंदा सात कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला नाही. यंदा ९९ सहकारी व १०१ खासगी अशा एकूण २०० कारखान्यांनी साखर गाळप हंगाम सुरू केला होता. मात्र, गेल्या वर्षाच्या अति पावसामुळे ऊस लागवडीवर परिणाम झाल्याने यंदा गाळपाला आलेला ऊस तुलनेने कमी आहे. त्या जोडीला सध्याचे कोरडे हवामान तसेच अवकाळी पावसाचा अभाव यामुळे साखर हंगाम लवकर संपत आहे. परिणामी आतापर्यंत २०० कारखान्यांपैकी १०२ कारखान्यांनी गाळप संपविले आहे.

सोलापूर विभागात ४५ कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली होती, त्यातील ४१ कारखाने बंद पडले आहेत. कोल्हापूर विभागातील ४० कारखान्यांपैकी २२ कारखान्यांनी धुराडी बंद केली असून, पुणे विभागातील ३१ पैकी १२ कारखाने बंद केले आहेत. अहिल्यानगर विभागातील २६ पैकी सहा कारखाने बंद झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत ८१४.९२ लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ७६.४३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात आतापर्यंत ९.३८ टक्के साखर उतारा मिळाला आहे. गेल्या वर्षी याच वेळेला ९५४.३४ लाख टन उसाच्या गाळपातून ९५.९२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. हवामान पोषक असल्याने राज्यात गेल्या वर्षी १०.०५ टक्के साखर उतारा मिळाला होता, तर एकूण २०७ गाळप हंगाम सुरू केलेल्या कारखान्यांपैकी केवळ ३८ कारखाने बंद झाले होते. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अंदाजानुसार राज्यात यंदा सुमारे ८६ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात २४ लाख टनांची घट अपेक्षित आहे, तर मार्च अखेरपर्यंत राज्यातील गाळप हंगाम संपण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Half of sugar factory closed in Maharashtra The season will end early 76 lakh tonnes of sugar produced so far