Pune Metro: हडपसर बस डेपो ते सासवड मेट्रो मार्ग बोगद्यातून जाणार; १६ मेट्रो स्थानके होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 20:30 IST2025-11-04T20:29:27+5:302025-11-04T20:30:20+5:30
हडपसर-लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडोर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Pune Metro: हडपसर बस डेपो ते सासवड मेट्रो मार्ग बोगद्यातून जाणार; १६ मेट्रो स्थानके होणार
पुणे : पुणेमेट्रो टप्पा - २ खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या उपमार्गिकांना मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. हडपसर-लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडोर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्याचबरोबर पुरंदर एअरपोर्ट येथे जाण्यासाठी रस्ते तसेच मेट्रोचे मल्टिलेव्हल इंटेग्रेशन करून पार्किंग सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.
मेट्रोच्या हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिका एकूण १६ किलोमीटर लांबीच्या असून, त्यामध्ये एकूण १४ उन्नत स्थानकांचा समावेश आहेत. या दोन्ही उपमार्गिकांसाठी ५,७०४ कोटी रुपये खर्च येणार असून, या पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्प महामेट्रोमार्फत कार्यन्वित करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. याबरोबरच पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे आणखी विस्तारित होणार असून, शहराच्या पूर्व परिसरासह ग्रामीण भागालाही मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे. यामुळे भविष्यात लाखो प्रवाशांना जलद आणि सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल. असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
तत्काळ भूसंपादन करण्याचे आदेश
पुण्यात मेट्रोचे जाळे तयार करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. पुणे चिंचवड महानगरपालिका ते निगडी या ४.४ किमी लांबीची इलिव्हेटेड मेट्रोचे काम हाती घेण्यात आले असून, हा प्रकल्प जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे.
स्वारगेट ते कात्रज ही अंडरग्राऊंड मेट्रो मार्च २०२९ पर्यंत पूर्ण होणार
स्वारगेट ते कात्रज ही अंडरग्राऊंड मेट्रो मार्च २०२९ पर्यंत पूर्ण होणार आहे. वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी हा कॉरिडोर जुलै २०२९ पर्यंत पूर्ण होणार आहे. पुणे मेट्रो लाईन ३ चे लवकर पूर्ण करून खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला या प्रकल्पासाठी तत्काळ भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
उपनगरातील नागरिकांना दिलासा
पुणे मेट्रो टप्पा - २ अंतर्गत होणाऱ्या या दोन उपमार्गिकांमुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवड या वाढत्या उपनगरांना मेट्रो जोडल्या वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना जलद वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. वाहतूक कोंडीमुळे बेजार झालेल्या प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.