उजनीच्या पाण्यावर हिरवा तवंग; पाण्याने प्रदूषणाची पातळी ओलांडली, प्रशासनाकडून डोळेझाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 11:29 IST2026-01-30T11:28:33+5:302026-01-30T11:29:04+5:30

उजनीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीसह, मासेमारी, पर्यटन या व्यवसायांना काही दिवसांतच अवकळा येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत

Green tint on Ujani water; Water crosses pollution level, administration turns a blind eye | उजनीच्या पाण्यावर हिरवा तवंग; पाण्याने प्रदूषणाची पातळी ओलांडली, प्रशासनाकडून डोळेझाक

उजनीच्या पाण्यावर हिरवा तवंग; पाण्याने प्रदूषणाची पातळी ओलांडली, प्रशासनाकडून डोळेझाक

भिगवण : पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी (यशवंत सागर) जलाशयाच्या प्रदूषण पातळीत कमालीची वाढ होतच चालली आहे. सध्या उजनीच्या पाण्यावर हिरवा तवंग आलेला असून पाण्याचा उग्र वास येऊ लागला असल्याने पाण्यातील जलचरांचे जीवनमान नष्ट होण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहे. तरी देखील या प्रदूषणाकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड आणि कुरकुंभ औद्योगिक वसाहतीसह साखर कारखान्यांचे प्रक्रिया न केलेले प्रदूषित पाणी ओढे, नदी, नाले याद्वारे थेट उजनीच्या पाण्यात येत असल्याने कधीकाळी शुद्ध पाणी दिसणारे सध्या काळे आणि हिरव्या रंगाचे झाले आहे. यामुळे उजनीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीसह, मासेमारी, पर्यटन या व्यवसायांना काही दिवसांतच अवकळा येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उजनी काठच्या गावातील नागरिक उजनीचे पाणी पिल्यांनंतर अनेक गंभीर आजार होत असल्याने ग्रामस्थांना विकतचे पाणी घेऊन प्यावे लागत आहे. तर काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले आहेत. प्रदूषित पाण्यामुळे गंभीर आजार होत असल्याने उजनीचे पाणी पिण्याचे टाळण्यात येते. परंतु पशु,पक्षी यांना याच पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे यामुळे पक्ष्यांच्या आणि माश्यांच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत.

माश्यांच्या नैसर्गिक प्रजनन होणाऱ्या सुंबर, वळंज, कोवरा, शिवडा,शेंगळ,साल्ट,फेक, आंबळी, गुगळी,शिलन,आहेर या माश्यांच्या देशी प्रजाती नष्ट झाल्या आहेत तर रोहू, कटला, मुगल, सफरनेस, गवत्या, सिल्व्हर यांसारख्या बोटांवर मोजण्या इतक्याच प्रजाती सध्या आढळत आहेत. प्रदूषित पाण्यामुळे विदेशातून येणारे अनेक पक्ष्यांची संख्या देखील कमी झाल्याचे पक्षिमित्रानी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सध्या उजनीच्या प्रदूषित पाण्यावर बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या वतीने संशोधन सुरू करण्यात आले आहे. संस्थेने केलेल्या पाणी तपासणीतून पाण्याची गंभीरता पुढे आली आहे. यातून जैवविविधतेला मोठा धोका देखील मानला जात आहे.

पाण्याचा स्पर्श झाल्यास सुटतेय खाज...

उजनीच्या पाण्यावर अवलंबून असणारे मासेमार तसेच शेतकरी हे पाण्यात अनेकदा उतरत असतात. पाण्यातील गाळात पाय रोवल्यानंतर पाण्यातून बाहेर आल्यानंतर हात, पायांची खाज सुटते. काहीवेळा पुरळ देखील येतात. यामुळे पाणी किती विषारी झालेय याची प्रचिती येऊ लागली आहे.

उजनीच्या घेतलेल्या पाणी नमुन्यात विरघळलेला ऑक्सिजन - ५.२-५.५ मिलिग्राम/ली असून हा प्रकार अधिवास धोक्यात आल्याचे दर्शवत आहे, जलचरांसाठी तणावपूर्ण स्थितीत संक्रमण होत आहे ; पीएच - ८.६ - ८.७ (अत्यंत क्षारीय वातावरण दर्शवत असून, अल्कधर्मी कचरा सोडल्यामुळे असू शकते ; टीडीएस - ६२४-७०० मिळाल्याने जलचर जीवनासाठी उच्च धोका निर्माण करते, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खराब असते, ओआरपी मूल्य - १४७-१६८ एमव्ही म्हणजे पाण्यात प्रक्रिया न केलेले सांडपाणी व अत्यंत खराब पाणी/पाणथळ जागेची स्थिती दर्शवत आहे. -डॉ. उन्मेष काटवटे (वरिष्ठ संशोधक, बीएनएचएस)

Web Title : उजनी के पानी पर हरी काई; प्रदूषण सीमा पार, प्रशासन बेखबर

Web Summary : उजनी जलाशय में प्रदूषण बढ़ा, जलीय जीवन खतरे में। औद्योगिक कचरे से पानी दूषित, कृषि, मत्स्य पालन, पर्यटन प्रभावित। ग्रामीण स्वास्थ्य समस्याओं से जूझ रहे, दूषित पानी के कारण खरीद या शुद्ध पानी पर निर्भर।

Web Title : Green Scum on Ujani Water; Pollution Crosses Limits, Administration Ignores

Web Summary : Ujani reservoir's pollution surges, endangering aquatic life. Untreated industrial waste contaminates the water, impacting agriculture, fishing, and tourism. Villagers face health issues, relying on purchased or purified water due to severe contamination.