पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याची कौतुकास्पद कामगिरी; २०२० मध्ये पती तर यंदा पत्नी ठरली 'आयर्न मॅन' स्पर्धेची मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 09:08 PM2021-04-12T21:08:58+5:302021-04-12T21:13:36+5:30

मागील वर्षी 2020 मध्ये दुबईला राहुल झांजुर्णे 'आयर्नमॅन' ठरले होते. त्यावेळी त्या स्पर्धेला त्यांच्या पत्नी स्मिताही उपस्थित होत्या.

Great performance of a doctor couple in Pune; the husband in 2020 and this year the wife became achieve the 'Iron Man' award | पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याची कौतुकास्पद कामगिरी; २०२० मध्ये पती तर यंदा पत्नी ठरली 'आयर्न मॅन' स्पर्धेची मानकरी

पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याची कौतुकास्पद कामगिरी; २०२० मध्ये पती तर यंदा पत्नी ठरली 'आयर्न मॅन' स्पर्धेची मानकरी

Next

- जयवंत गंधाले

पुणे : हडपसर येथील डॉक्टर दाम्पत्यांनी सलग दोन वर्ष 'आयर्नमॅन' होण्याचा बहुमान मिळविला आहे.  दुबईमध्ये झालेल्या या स्पर्धेत २०२० ला डॉ. राहुल झांजुर्णे तर यंदा त्यांच्या पत्नी डॉ.स्मिता झांजुर्णे 'आयर्नमॅन' च्या मानकरी ठरल्या आहेत. डॉक्टर दाम्पत्याने दुबईमध्ये भारताचा डंका वाजविला आहे. 

मागील वर्षी 2020 मध्ये दुबईला राहुल झांजुर्णे 'आयर्नमॅन' ठरले होते. त्यावेळी त्या स्पर्धेला त्यांच्या पत्नी स्मिताही उपस्थित होत्या. तेव्हाच ठरविले की, आपणही अशक्य वाटणारी आयर्नमॅन स्पर्धेत उतरायचे. पाठोपाठ स्पर्धेची तयारी देखील सुरु केली.

डॉ. स्मिता म्हणाल्या, दुबईलाच पहिली 'आयर्नमॅन' करायचा योग येईल असे कधी वाटलंही नव्हतं. आयुष्यात पाण्यातच कधी उतरले नाही, त्यामुळे स्विमिंग येण्याचा प्रश्नच नव्हता. ट्रेनिंग सुरू केले आणि लॉकडाऊन सुरु झाला. स्विमिंग पूल बंद झाल्यामुळे स्विम ट्रेनिंगचा खेळखंडोबाच झाला. 'आयर्नमॅन' स्पर्धा होण्याची पण काहीच चिन्हं दिसत नव्हती. त्याही कठीण परिस्थितीत प्रशिक्षण सुरू  ठेवले.

साधारणतः ऑक्टोबरमध्ये लॉंगराईड सुरू केल्या आणि जानेवारीमध्ये स्विमिंगसाठी कोचिंग सुरू केले. हाडं गोठवणाऱ्या, बर्फासारख्या थंड पाण्यात, दोन अडीच महिन्यात न येणारी गोष्ट शिकणं माझ्यासाठी खरंच कठीण होतं. दररोज न चुकता पहाटे चार वाजता उठून पाच सव्वा पाचला पाण्यात उडी मारणं आणि आल्यावर परत रनिंग आणि सायकलिंग करण्यात दिवस असे भुर्रकन उडून जात होते.

स्पर्धेमध्ये मोठमोठ्या उसळत्या लाटा ,समुद्राचं खारं पाणी आणि परत फिरल्यावर तापलेल्या सूर्याची  डोळ्यात घुसणारी किरणं यांच्यावर मात करून ५८ मिनिटांत म्हणजेच बारा मिनिटे राखून स्विमिंग पूर्ण केलं.  आणि मनातल्या मनात माझे स्विमिंग कोच शुभंकर सर यांना मी अभिवादन केलं आणि ट्रान्सिशन झोनमध्ये त्यांनी  उडी मारली.

त्यांनी सायकलिंगचे सामान ठेवलेली ट्रान्झिशन बॅग कुणीतरी उचलून नेली होती. (ज्या बॅगशिवाय तुम्ही सायकलिंगला जाऊच शकत नाही अशी बॅग )त्यामुळे पहिल्या 'आयर्नमॅन' चे स्वप्न भंग पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी जवळपास लाखमोलाची सहा मिनिटे गेली. त्यात युरोपमधल्या दोन स्पर्धक देवासारख्या मदतीला धावून आल्या आणि स्वतःची रेस सोडून माझी बॅग शोधण्यास मदत करू लागल्या. त्यांनी सुचवले की, ऑफिशियल कंप्लेंट करून बघू काय होतंय. कंप्लेंट केल्यावर दोन मिनिटांत माझी बॅग त्यांनी शोधून दिली. 

'आयर्नमॅन' मध्ये एक एक मिनिटं महत्त्वाचा असतो. त्यात सहा मिनिटे गेल्यावर जरा दुखावलेल्या मनाने सायकलवर स्वार झाले. प्रचंड हेड वींड म्हणजे उलटे वारे आणि वाळवंटातील ३९ अंश सेल्सिअसच्या तापत्या उन्हाने, धावपळीत हरवलेल्या न्युट्रीशन (केळी,चिक्की)च्या कमतरतेने त्यांची चांगलीच फिरकी घेतली. 

शेवटचा रनिंग लेग, ९० किलोमीटरचे सायकलिंग संपवून रनिंगचे शूज घालून २१ किलोमीटर धावण्याची मानसिक तयारी त्यांनी केली आणि रणरणत्या उन्हात धावायला सुरुवात केली. 
 
शेवटच्या काही किलोमीटरला माझ्या पतीने खूप चिअरअप केले. "स्मिता ही 30 मिनिटे तुझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाहीत " असं ते ओरडून सांगत होते. आणि त्याच्यानंतर तर मी धावतच सुटले. हातात त्यांनी आपल्या भारताचा झेंडा दिला आणि डोळ्यासमोर खुणावणारी फिनिश लाईन दिसली. माझ्या आनंदाला उधाण आलं. फिनिश लाईन क्रॉस केली, आमच्या साऱ्यांच्या कष्टाचे चीज झाले आणि माझे "आयर्न मॅन"होण्याचे स्वप्न सत्यात उतरले.

तू ही स्पोर्ट्समध्ये ये असा कायमच आग्रह धरणारे माझे पती डॉ. राहुल तसेच नेहमीच माझे मनोबल वाढवणारे,मला प्रचंड पाठिंबा देणाऱ्या माझ्या कुटुंबासह सर्व सहकाऱ्यांचे मी ऋणी आहे. डॉ.स्मिता झांजुर्णे.

Web Title: Great performance of a doctor couple in Pune; the husband in 2020 and this year the wife became achieve the 'Iron Man' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.