तब्बल ६८ लाखांच्या मालाचा छडा; अवघ्या ७२ तासांत गुन्ह्याची उकल, एका आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 19:38 IST2025-12-26T19:38:04+5:302025-12-26T19:38:18+5:30
रांजणगाव येथील चमाडिया गोडाऊनमध्ये आयटीसी कंपनीचा सिगारेट, बिस्किटे, साबण व इतर वस्तूंचा मोठा साठा ठेवण्यात आला होता

तब्बल ६८ लाखांच्या मालाचा छडा; अवघ्या ७२ तासांत गुन्ह्याची उकल, एका आरोपीला अटक
पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत रांजणगाव येथील गोडाऊनमधून चोरी झालेल्या तब्बल ६८ लाख रुपयांच्या मालाचा छडा लावला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, अवघ्या ७२ तासांत गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव येथील चमाडिया गोडाऊनमध्ये आयटीसी कंपनीचा सिगारेट, बिस्किटे, साबण व इतर वस्तूंचा मोठा साठा ठेवण्यात आला होता. हा माल ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून डिलर्सकडे पाठवला जातो. माल वाहतुकीसाठी मुव्हिंग लॉजिस्टिक कंपनीची चार इलेक्ट्रिक पिकअप वाहने वापरली जात असून, रात्रीच्या वेळी ही वाहने मालासह आणि चलनासह गोडाऊन परिसरात उभी ठेवण्यात येतात. याच संधीचा फायदा घेत १७ डिसेंबर रोजी पहाटे अज्ञात चोरट्याने माल भरलेले एक इलेक्ट्रिक पिकअप वाहन सुरू करून गेटवर चलनाची नोंद करत थेट वाहनासह सुमारे ६५ लाख रुपयांचा माल चोरून नेला.
या घटनेनंतर रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी विविध पथके तयार करून तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान चोरट्यांनी चोरी केलेले पिकअप वाहन गोडाऊनपासून काही अंतरावर सोडून दिल्याचे, तसेच त्यामधून सुमारे ५४ लाख रुपये किमतीच्या सिगारेट घेऊन फरार झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणात परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपास सुरू असतानाच संबंधित वाहन डिलिव्हरीसाठी नेत असताना वाघोली परिसरात आढळून आले. त्यानंतर वाहनाचे मालक, सुपरवायझर आणि चालकांची चौकशी करण्यात आली.
या चौकशीत सुपरवायझर प्रथमेश चव्हाण याने आरोपी दिपक ज्ञानेश्वर ढेरंगे आणि अल्ताफ आयुब मुल्ला यांना चोरीसाठी वाहन दिल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रथमेश ज्ञानेश्वर चव्हाण याला अटक केली आहे. तपासात आरोपीकडून चोरीस गेलेला माल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन असा एकूण ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास रांजणगाव पोलीस ठाणे करत आहे.