PM Kisan Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता शुक्रवारी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 10:49 IST2026-03-11T10:48:26+5:302026-03-11T10:49:02+5:30
या योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबरमध्ये देण्यात आला होता. तब्बल ४ महिन्यांनंतर २२ व्या हप्त्याची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त साधण्यात आला आहे

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता शुक्रवारी मिळणार
पुणे : पीएम किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता शुक्रवारी (दि. १३) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी राज्यातील ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकरी पात्र ठरले आहेत. निधी वितरणचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आसामची राजधानी गुवाहाटी येथे होणार आहे. तर राज्यातील कार्यक्रमाबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. या योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबरमध्ये देण्यात आला होता. तब्बल चार महिन्यांनंतर २२ व्या हप्त्याची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त साधण्यात आला आहे. या हप्त्यासाठी सर्वाधिक ५ लाख ४५ हजार २८० शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत.
केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा केला होता. केंद्र सरकारकडून त्यानंतर २२ व्या हप्त्यासाठी लाभार्थी निश्चित करण्यात आले होते. हा हप्ता जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मिळेल, असे बोलले जात होते. मात्र, तो मुहूर्त हुकला. पीएम किसानच्या २१ व्या हप्त्यात राज्यातील ९० लाख ४१ हजार २४१ शेतकरी पात्र ठरले होते. तर २२ व्या हप्त्यासाठी ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यानुसार आताच्या हप्त्यात १ लाख २ हजार ५९० शेतकरी वाढले आहेत. योजनेच्या निधी वितरणाचा मुख्य सोहळा आसामची राजधानी गुवाहाटी येथे शुक्रवारी (दि. १३) होणार आहे. तर राज्यातील कार्यक्रमाचे नियोजन सुरू असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.