GBS : 'पाणीपुरी खाल्ल्यानंतर ‘GBS’ झाला अन् काही दिवसातच तरुणीने जीव...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:07 IST2025-02-19T14:07:43+5:302025-02-19T14:07:56+5:30
पुण्यातील नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्याची व्यवस्था केली होती. मात्र

GBS : 'पाणीपुरी खाल्ल्यानंतर ‘GBS’ झाला अन् काही दिवसातच तरुणीने जीव...'
बारामती - जीबीएस सिंड्रोम आजाराची लागण झालेल्या बारामतीच्या युवतीने अखेर मंगळवारी(दि १८) शेवटचा श्वास घेतला. किरण राजेंद्र देशमुख (वय २६) असे या युवतीचे नाव आहे. गेल्या २३ दिवसांपासून तिच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु होेते. बारामतीतील किरण ही सिंहगड परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होती. याच दरम्यान तिला जीबीएसची लागण झाली होती.
किरण ही शिक्षणाच्या निमित्ताने सिंहगड परिसरात नातेवाईकांकडे राहत होती. सिंहगड परिसरात किरणने तीन आठवड्यापूर्वी पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला. २३ जानेवारीला किरण हि बारामती येथील तिच्या घरी आली होती. यावेळी तिला अन्न गिळण्यास त्रास जाणवू लागला.त्यानंतर बारामती शहरातील डाॅक्टरांकडे सुरवातीला उपचार घेण्यात आले.मात्र,त्यानंतर जीबी सिंड्रोम सदृश्य लक्षणे आढळल्याने तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.दरम्यान ‘एनआयव्ही’ च्या तपासणीत तिला जीबी सिंड्रोम ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. पुण्यात तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र तिची प्रकृती खालावत गेली आणि आज तिचे निधन झाले, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.बारामतीत एकही जीबी सिंड्रोमचा रुग्ण नसल्याचे देखील डाॅ.खोमणे यांनी स्पष्ट केले.
किरणची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.तिचे वडील रीक्षाचालक आहेत.काही दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत आल्यावर त्यांना तिच्यावर पुण्यात सुरु असलेल्या उपचारांबाबत माहिती देण्यात आली होती.तेव्हा देशमुख यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत अजित पवार यांनी किरणला नवले हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्याचे नियोजन केले.त्या ठीकाणी तिच्यावर उपचार सुरु होते,अशी माहिती स`थानिक नगरसेवक,माजी उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव यांनी दिली.
किरण देशमुख हिने पुण्यात राहुन ‘एमसीए’ हि पदवी मिळवत शिक्षण पुर्ण केले होते.शिक्षण पुर्ण केल्यानंतर ती नोकरीच्या शोधात होती.मात्र,याच दरम्यान जीबीएस सिंड्रोमने तिचा बळी घेतला.त्यामुळे बारामतीत हळहळ व्यक्त होत आहे.किरण हिच्यावर जळोची येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बारामती शहरात फेब्रुवारीच्या पहिल्या महिल्यात ६५ वर्षीय रुग्णाला जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराची लागण झाली होती.मात्र,एनआयव्ही कडे केलेल्या तपासणीत या ज्येष्ठाला जीबी सिंड्रोम आजार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे,असे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी सांगितले.