Pune | परदेशात चोरीचे मोबाइल विकणारी टोळी जेरबंद; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 06:01 PM2023-01-07T18:01:48+5:302023-01-07T18:03:28+5:30

तीन आरोपींना अटक केली असून, दोघे जण फरार...

Gang selling stolen mobile phones abroad jailed in Pune; 19 lakhs worth of goods seized | Pune | परदेशात चोरीचे मोबाइल विकणारी टोळी जेरबंद; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune | परदेशात चोरीचे मोबाइल विकणारी टोळी जेरबंद; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext

आळेफाटा (पुणे) : येथील मोबाइल शाॅपी फोडून तब्बल १३ लाखांच्या वर मुद्देमाल पळवून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे. यातील तीन आरोपींना अटक केली असून, दोघे जण फरार आहेत. आरोपींकडून १४ लाख ५० हजार व पिकअप जीप, असा १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिली.

ईश्वरलाल हिंमतलाल इरागर (वय ३२, रा. विरार, जि. पालघर, मूळ रा. सिरोही राजस्थान), महावीर जोरसिंग कुमावत (वय ३५, रा. विरार, जि. पालघर, मूळ पाली, राजस्थान) व आवेश अब्दुल सत्तार कपाडिया (वय ३२, रा. चौकबाजार सिंधीवाड, सुरत), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.५) पहाटेच्या सुमारास चेतन गुगळे यांचे आळेफाटा चौकापासून जवळच असलेल्या मोबाइल शॉपीचे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून विविध कंपन्यांचे १४० च्या वर मोबाइल व सीसीटीव्ही कॅमेरा, असा १३ लाख १३ हजार रुपयांच्या वस्तू लंपास केल्या होत्या. याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांनी तपास सुरू केला. या बिल्डिंगमधील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत गुन्ह्यात वापरलेली जीप (क्रमांक एम एच ४८ एन जी २३८०) ही या परिसरात आढळून आली.

सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत विरार येथून ईश्वरलाल इरागर व महावीर कुमावत यांना, तसेच गुन्ह्यात वापरलेली जीप ताब्यात घेतली. अधिक तपास केला असता त्यांनी शाहीद अब्दुल सत्तार कपाडिया व संजय यादव ऊर्फ म्हात्रे यांच्यासह आळेफाटा येथील मोबाइल शाॅपी फोडल्याची कबुली दिली. अधिक तपास केला असता यातील फरार आरोपी शाहीद कपाडिया याने सदरचे मोबाइल हे त्याचा भाऊ आवेश कपाडिया यास विकल्याचे सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर पोलिस हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारखे व अमित माळुंजे यांनी सुरत येथे जाऊन आवेश कपाडिया यास ताब्यात घेतले. त्याने हे मोबाइल विकत घेतल्याचे व हे मोबाइल दक्षिण आफ्रिका, नेपाळ व बांगलादेश येथे एका व्यक्तीमार्फत विकल्याचे सांगितले. त्याच्याकडून १४ लाख ५० हजार रुपये ताब्यात घेत अटक केली.

ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक नितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, सहायक फौजदार चंद्रशेखर डुंबरे, पोलिस हवलदार विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, नवीन आरगडे, हनुमंत ढोबळे, प्रशांत तांगडकर, सुनील कोळी यांनी केली.

Web Title: Gang selling stolen mobile phones abroad jailed in Pune; 19 lakhs worth of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.