फॉरेन्सिकच्या अहवालानंतरच होणार पुढील कारवाई; पेनड्राइव्ह, हार्ड डिस्क, सीडी, आक्षेपार्ह साहित्य, डायऱ्या एटीएसकडून जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 13:31 IST2025-10-11T13:30:08+5:302025-10-11T13:31:48+5:30
कोंढवा, खडक, खडकी, वानवडी, भोसरी आणि मोशीसह येथील छापेमारीत अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली असून काही महत्त्वाचे पुरावे हस्तगत केल्याची माहिती समोर आली आहे

फॉरेन्सिकच्या अहवालानंतरच होणार पुढील कारवाई; पेनड्राइव्ह, हार्ड डिस्क, सीडी, आक्षेपार्ह साहित्य, डायऱ्या एटीएसकडून जप्त
पुणे : शहरात दहशतवादी सक्रिय असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर एटीएस आणि पुणेपोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अनेक आक्षेपार्ह बाबी एटीएसच्या हाती लागल्या आहेत. डिजिटल साहित्य, पेनड्राइव्ह, हार्ड डिस्क, सीडी, आक्षेपार्ह साहित्य, डायऱ्या, नोट्स व अन्य कागदपत्रे एटीएसने जप्त केली असून, या वस्तू फॉरेन्सिक लॅबला तपासासाठी पाठवल्या आहेत. फॉरेन्सिक अहवालानंतरच संशयित दहशतवाद्यांचा चेहरा समोर येईल, अशी माहिती एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
गुरुवारी मध्यरात्रीपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या १९ ठिकाणी एकाच वेळी धडक कारवाई केली. कोंढवा, खडक, खडकी, वानवडी, भोसरी आणि मोशीसह येथील छापेमारीत अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली असून काही महत्त्वाचे पुरावे हस्तगत केल्याची माहिती समोर आली आहे. तपासात समोर आलेले प्राथमिक धागेदोरे २०२३ मध्ये पुण्यात उघडकीस आलेल्या ‘आयसीसशी मॉड्युलशी’ संबंधित कटाशी मिळतेजुळते असल्याची शंकादेखील व्यक्त केली जात आहे.
व्यावसायिक, आयटी अभियंते, ठेकेदार यांचा समावेश...
दरम्यान, एटीएसने केलेल्या छापेमारीमध्ये संशयितांची घरे, ऑफिस, दुकानांची पथकांनी झाडाझडती घेतली. यातील अनेक जण व्यावसायिक, आयटी अभियंते, ठेकेदार असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. ही मंडळी एकत्रितरीत्या धार्मिक स्थळांवर जात होती, अशी माहितीदेखील समोर आली आहे.
नवीन गुन्हा दाखल होण्याची शक्यता...
एप्रिल २०२३ मध्ये साताऱ्यातील एका दुकानात टाकलेला हा दरोडा म्हणजे दहशतवादी कारवायांच्या निधी उभारणीसाठी केलेले कृत्य असल्याचे तपासातून समोर आले होते. त्याच अनुषंगाने एटीएसने ७/२०२३ हा गुन्हा नव्याने दाखल केला होता. त्याच गुन्ह्याचा तपास पुणे एटीएस करीत आहे. पुण्यातील आयसीस मोड्यूल प्रकरणात सहभागी असलेले दहशतवादी मोहम्मद शहानवाज आलम शफीउमा खान ऊर्फ इब्राहीम ऊर्फ प्रिन्स (३२, रा. झारखंड), मोहम्मद युनूस मोहम्मद याकुब साकी ऊर्फ छोटू (२७, रा. कोंढवा, मूळ रा. रतलाम, मध्य प्रदेश), जुल्फिकार अली बरोडावाला ऊर्फ लाला ऊर्फ लालाभाई (४४, बोरीवली, राहूर पडगा, भिवंडी, ठाणे, मूळ रा. बरोडा, गुजरात) आणि जून महिन्यात तलाह लियाकत अली खान (३७, रा. कोंढवा) याला मुंबईतील कारागृहातून साताऱ्यातील दरोड्यात सहभाग असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली होती. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड परिसरात जे आतंकवादी वाहन चोरी करताना पकडले गेले, त्याप्रकरणी सुरुवातीला कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तपासादरम्यान देशविघातक कृत्यांमध्ये संबंधित आरोपींचा समावेश असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर हा गुन्हा एटीएसकडे वर्ग झाला. ६/२०२३ नुसार याप्रकरणी एटीएसकडे नोंदवण्यात आला होता. पुढे या गुन्ह्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झाल्यानंतर या गुन्ह्याचा तपास एनआयएकडून सुरू असून याप्रकरणात एक मुख्य आरोपपत्राबरोबर दोन पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आली आहेत. यालाच पुढे पुणे मोड्यूल म्हणून संबोधले गेले. त्याप्रकरणी राष्ट्रविरोधी कृत्य केल्याप्रकरणात व आयसीस या दहशतवादी संघटनेसाठी निधी उभारल्याप्रकरणात १३ जणांना अटक होऊन त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे. त्यातीलच आरोपींचा सातारा येथील दरोड्यात सहभाग आढळल्याने त्यांना एटीएस तपास करीत असलेल्या ७/२०२३ या गुन्ह्यात अटक झाली आहे. गुरुवारी केलेल्या कारवाईत महत्त्वपूर्ण माहिती व कनेक्शन एटीएसच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात नव्याने गुन्हादेखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चौकशीसाठी बोलवले...
दरम्यान एटीएसने छापेमारी केल्यानंतर संशयितांना टप्प्याटप्प्याने एटीएस कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.