मोबाईल टॉर्च लावून अंधूक प्रकाशात अंत्यसंस्कार; कोथरुडमध्ये स्मशानभूमीतील चिंताजनक परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 10:05 IST2025-08-22T10:04:25+5:302025-08-22T10:05:00+5:30
स्मशानभूमीतील सुरक्षारक्षकाकडे विचारणा केली असता, ‘लाईट उद्या येईल’ असे उत्तर मिळाल्याने नागरिकांत नाराजी पसरली

मोबाईल टॉर्च लावून अंधूक प्रकाशात अंत्यसंस्कार; कोथरुडमध्ये स्मशानभूमीतील चिंताजनक परिस्थिती
कोथरूड : पुणे महापालिका हद्दीमध्ये राहताना वीज, रस्ते, वाहतूक कोंडी, कचरा अशा अनेक समस्यांमुळे जिवंतपणीच मरणयातना सहन कराव्या लागतात. मात्र, आता मेल्यानंतरही महापालिकेकडून त्रास दिला जातो हेच सिद्ध झाले आहे. कारण माणूस मेल्यावर जिथे अंत्यसंस्कार होतात त्या स्मशानातही वीजपुरवठा नाही, त्यामुळे अंत्यसंस्कार करताना नातेवाइकांना मोबाइल टॉर्च लावून त्या अंधूक प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
कोथरुड, शास्त्रीनगर परिसरातील स्मशानभूमीत सोमवारी रात्री अंत्यसंस्काराची वेळ आली तेव्हा वीजपुरवठा खंडित असल्याने परिसर पूर्णतः अंधारात बुडाला. नातेवाइकांनी मोबाइलच्या टॉर्चच्या उजेडात अंत्यविधी पूर्ण करावा लागल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे कोथरुडकरांनी महापालिका प्रशासनावर प्रचंड संताप व्यक्त केला. वास्तविक महापालिकेकडून मिळकत कर घेतल्यावर रस्ते, ड्रेनेेज आदी गोष्टींची सुविधा व्यवस्थित देणे अपेक्षित असताना महापालिका तेथे अपयशी ठरते. त्यामुळे किमान माणूस मेल्यानंतर त्यांच्या अंतिम सेवेसाठी तरी महापालिकेने प्रामाणिकपणे सोयी सुविधा पुरविल्या पाहिजेत. मात्र, तेथेसुद्धा महापालिकेकडून सुविधा पुरविल्या जात नाहीत हे पुणेकरांचे दुर्दैव आहे. पुण्यासारख्या महानगरातही अशी परिस्थिती निर्माण होणे लज्जास्पद असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या अनेक वयोवृद्धांना अंधारामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. शिवाय सुरक्षा दृष्टीनेही धोक्याची परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांनी तातडीने महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन स्मशानभूमीत आवश्यक सुविधा कायम ठेवाव्यात, अशी मागणी केली आहे.
लाईट उद्या येईल
स्मशानभूमीतील सुरक्षारक्षकाकडे विचारणा केली असता, ‘लाईट उद्या येईल’ असे उत्तर मिळाल्याने नागरिकांत नाराजी पसरली. वास्तविक येथे अंत्यसंस्कारासाठी एखादा मृतदेह आल्यानंतर तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी धावपळ करणे अपेक्षित होते. वीज नसेल तर पर्यायी व्यवस्था उभी करणे आवश्यक होते. मात्र, सुरक्षा रक्षकाने ना अधिकाऱ्यांंना फोन केला ना पर्यायी रस्ता उभा केला. त्यामुळे अखेर मोबाइलच्या टॉर्च लाईटमध्ये नागरिकांना अंत्यसंस्कार उरकावे लागले.
पावसात भिजत केले अंत्यसंस्कार
स्मशानभूमीत पावसापासून संरक्षण देण्यासाठी मोठे शेड उभे करणे आवश्यक असताना या स्मशानभूमीत तशी व्यवस्था केली नाही. त्यामुळे भर पावसात नागरिकांना उभे राहूनच अंत्यसंस्कार करावे लागतात. लाईट नसताना अशा पावसात दहन शेडपर्यंत जाताना नागरिकांचे हाल होतात. मात्र, त्याकडे महापाालिका लक्ष देत नाही.
पुणे महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक पूर्वांचलामधील राज्यापेक्षाही अधिक आहे. मेट्रोसिटी म्हणून ओळख असणाऱ्या पुणे शहर आता जगण्यासाठी कठीण झाले हे माहीत होते. परंतु आता मेल्यावरही हाल होत आहेत हे पुण्यासाठी लांछनास्पद आहे. - समर्थ जोशी, कोथरुड रहिवासी