लग्नाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; अविवाहित तरुणांना लुटले, ७ जणांच्या टोळीचा अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:53 IST2025-07-09T17:52:38+5:302025-07-09T17:53:08+5:30

गुन्ह्यातील महिला या मध्यस्थी एजंट म्हणून अनेक तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले

Fraud of lakhs on the pretext of marriage; Unmarried youths robbed, gang of 7 arrested | लग्नाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; अविवाहित तरुणांना लुटले, ७ जणांच्या टोळीचा अटक

लग्नाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; अविवाहित तरुणांना लुटले, ७ जणांच्या टोळीचा अटक

नारायणगाव : अविवाहित तरुणांसोबत बनावट लग्न करून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ८ जणांच्या टोळी पैकी ७ जणावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे , या टोळीने ७ लग्न करून फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

फसवणूक गुन्ह्यात सुवर्णमाला सुरेश वाडकर (रा. छत्रपती संभाजी नगर), मनीषा अडसुळे (रा. सिंहगड रोड पुणे), संतोष सखाराम घोडे (रा. पिंपळनेर पावर हाऊ जवळ जालना रोड, ता. देऊळगाव जि. बुलढाणा), भारती दामोदर मोरे (रा. डोणगाव इंदिरानगर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा), अश्विनी सागर जगदाळे (रा. १६५/ पी पर्वती दर्शन स्वारगेट पुणे) सुनील काळे (रा. पंचतळे, शिरूर , पंकज डग रा. पंचतळे, शिरूर , नामदेव कोल्हे रा, जांबुत, ता. पारनेर जि. अहिल्यानगर) या आरोपींना त्यांचे बुलढाणा जिल्ह्यातील मूळ गावी जाऊन तपास करून ताब्यात घेऊन नारायणगाव पोलीस स्टेशन येथे आणले आहे. यातील आरोपींनी याच प्रकारे गुन्हा करून अनेक युवकांना आर्थिक दृष्ट्या फसवले असून या टोळीने मध्यस्थी करून लग्न लावून दिले याबाबत ओतूर पोलीस स्टेशन येथे देखील गुन्हा दाखल आहे.  

या गुन्ह्यातील महिला या मध्यस्थी एजंट म्हणून अनेक तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्ह्यातील वधू महिला अश्विनी सागर जगदाळे बाबत तपास केला. तिला १६ वर्षाची एक मुलगी असून १४ वर्षाचा एक मुलगा आहे. तसेच या महिलेने अशाप्रकारे सुमारे सहा ते सात तरुणांना लग्न करून फसवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील चार आरोपी हे न्यायालयीन कोठडीत असून तीन आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दाखल गुन्ह्यातील एका आरोपीस अटक करणे बाकी असून सदर आरोपींनी जुन्नर, पारनेर, शिरूर इत्यादी ठिकाणी देखील याच प्रकारचे गुन्हे केले असल्याची माहिती सदर गुन्ह्याचे तपासात मिळून आली आहे. सदर गुन्ह्यात एकूण २५ हजार इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. 

पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक जगदेवाप्पा पाटील हे करत आहेत.

Web Title: Fraud of lakhs on the pretext of marriage; Unmarried youths robbed, gang of 7 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.