वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या माजी उपसरपंचाची फॉर्च्यूनर कार जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 10:12 IST2025-01-16T10:12:16+5:302025-01-16T10:12:53+5:30
या गाडीवर सुमारे २३ हजारांचा दंड बुधवारी भरण्यात आला आहे, अशी महिती पोलिसांनी दिली.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या माजी उपसरपंचाची फॉर्च्यूनर कार जप्त
वारजे : येथील वारजे वाहतूक विभागाने वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी एका माजी उपसरपंच यांची काळ्या रंगाची फॉर्च्युनर मोटारकार जप्त केली आहे. विशेष म्हणजे या गाडीवर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनंतर पुढाकार घेण्यात आला.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, (एमएच १२ व्हीएल २५४५) या नंबरची काळ्या रंगाची एक फॉर्च्युनर मोटार फर्ग्युसन रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी उभी असल्याचे आढळून आले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पाठवलेल्या या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाची ही गाडी असून त्याच्या सर्व काचादेखील पूर्णपणे काळ्या होत्या. या गाडीची मागच्या बाजूची नंबर प्लेटदेखील तुटलेली आढळून आली. त्यामुळे मागून गाडीची ओळख पटविणे अवघड होते. याबद्दल कोणीतरी सजग नागरिकाला हा काहीतरी वेगळा प्रकार झाला असल्याचे संशयातून त्यांनी याबाबतचा व्हिडीओ काढून पोलिस आयुक्तांना पाठवला.
आयुक्तांनी याची दखल घेत तातडीने सूत्रे हलवली व गाडीची तपासणी केली असता ही गाडी वारजे वाहतूक विभागअंतर्गत एका माजी उपसरपंच अमोल कारले यांच्या नावावर असलेली आढळून आली. याबाबत अधिक माहिती घेतली असता या गाडीवर थोडे थोडे नव्हे तर प्रिंटेड ग्लास (म्हणजे काळ्या काचा), तसेच महामार्गावर अधिक वेगाने गाडी चालवणे (ओव्हर स्पीड) असा विविध कलमानुसार वाहतूक भंग केल्याबद्दल सुमारे २३ हजारांचा दंड या गाडीवर पेंडिंग असल्याचेदेखील आढळून आले. याबाबत पोलिस आयुक्त कार्यालयाने तातडीने वारजे वाहतूक विभागाला तसा निरोप कळवला वारजे वाहतूक विभागांनी या ठिकाणी ही गाडी ताब्यात घेतली असून या गाडीवर सुमारे २३ हजारांचा दंड बुधवारी भरण्यात आला आहे, अशी महिती पोलिसांनी दिली.
दरम्यान गाडीवर असलेला दंड भरून घेतला असून पोलिस आयुक्तांच्या सूचनेनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वारजे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम मिसाळ यांनी लोकमतला दिली.