पहिल्यांदा अजित पवारांची सही होती, नंतर मुख्यमंत्र्यांची; शंकर मांडेकरांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:59 IST2025-11-22T16:58:22+5:302025-11-22T16:59:29+5:30
भोरमध्ये जरी सत्ता अजित पवारांची असली तरी राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस आहेत हे लक्षात ठेवावे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते

पहिल्यांदा अजित पवारांची सही होती, नंतर मुख्यमंत्र्यांची; शंकर मांडेकरांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
भोर : कोणत्याही कामासाठी पहिल्यांदा पालकमंत्री अजित पवार यांची सही होते.आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे जाते यासाठी फाईलवर अजित पवारची सही नसेल तर फाईल पुढे जाणारच नाही असे प्रत्युत्तर भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.
भोर नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रचाराचा शुभारंभ भोर शहरातील राजवाडा येथे पार पडला. याच दिवशी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ पार पडला होता. या शुभारंभप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आपल्या भाषणात म्हणाले होते की, भोरमध्ये जरी सत्ता अजित पवारांची असली तरी राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस आहेत हे लक्षात ठेवावे. यामुळे भोरच्या जनतेने कुणाच्या पाठीमागे जायचे आहे हे ठरवावे. असे चंद्रकांत पाटील बोलले होते. याला प्रतिउत्तर मांडेकर यांनी दिले आहे. फाईलवर पहिल्यांदा सही अजितदादांची होते. नंतरच फाईल पुढे जाऊन मुख्यमंत्री त्याच्यावर सही करतात. अजित दादांनी फाईलवर सहीच केली नाही. तर फाईल पुढे जाणार नाही याचे भान ठेवावे. असे प्रत्युत्तर मांडेकर यांनी प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी दिले.
राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रामचंद्र आवारे म्हणाले, एकदा संधी द्या भोरची बारामती करून दाखवतो. विकास नाही केला तर पुन्हा राजकारणात पडणार नाही. यावेळी बोलताना रणजी शिवतारे म्हणाले भोरमधील औद्योगिक वसाहतीला कोणाचा विरोध आहे हे सर्वांना माहित आहे स्वतः काम करायचं नाही दुसऱ्याला करून द्यायचं नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला नगरपालिकेमध्ये बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.