'आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं', पुतण्याच्या लग्नापेक्षा प्रचार महत्त्वाचा - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:07 IST2025-12-01T13:06:50+5:302025-12-01T13:07:33+5:30
माझ्याही घरात आज लग्न आहे, पण मी प्रचारात आहे असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.

'आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं', पुतण्याच्या लग्नापेक्षा प्रचार महत्त्वाचा - अजित पवार
इंदापूर : नको ती माणसे एकत्र आली आहेत. एकमेकांची तोंड बघत नव्हती, एकमेकांवर हल्ला करायची, आज मांडीला मांडी लावून बसत आहेत. कोण कुणाबद्दल काय बोलला आहे, जरा इतिहास आठवा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला.
इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, तुमच्यातले काहीजण एकोणीस वर्षे मंत्री होते, त्यांना शिरसोडी कुगाव पूल का करता आला नाही. मंत्री असताना काय केले, जॅकेट घातली? स्टाइल मारली? कुठेही फोटो काढायचा म्हटले तरी ते लगेच मध्ये हा चेहरा येतोच, या शब्दात त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. स्व. शंकर पाटील यांनी अतिशय बारकाईने उभा केलेला कर्मयोगी साखर कारखाना तुमच्या नेतृत्त्वाने चालवायला दिला. एवढे आमचे कर्तृत्व बघा, त्या निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावर कर्जाचा डोंगर केला आहे. आम्ही पीडीसीमधून पैसे दिलेत. १९ वर्षे नेतृत्व करून तुम्ही एकतरी चांगलं काम केले आहे ते दाखवा, असेही अजित पवार म्हणाले.
पुतण्याच्या लग्नापेक्षा प्रचार महत्त्वाचा
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार रविवारी विवाहबंधनात अडकले आहे. या निमित्ताने सगळे पवार कुटुंबीय एकत्र आले आहेत. मात्र पुतण्याच्या लग्नात उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर होते. अजित पवार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात दंग असल्याचे दिसले. त्यांनी दौंड येथील प्रचाराला उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना त्यांनी आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं या ऐतिहासिक वाक्याचा दाखला दिला. माझ्याही घरात आज लग्न आहे, पण मी प्रचारात आहे असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.