शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता; पूजा खेडकरच्या आईचा शस्त्र परवाना रद्द, पोलीस आयुक्तांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:50 IST2026-01-13T12:49:57+5:302026-01-13T12:50:08+5:30
मनोरमा खेडकर यांचे वर्तन हे कायद्याला न जुमानणारे व गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, भविष्यात परवानाधारक शस्त्राचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे

शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता; पूजा खेडकरच्या आईचा शस्त्र परवाना रद्द, पोलीस आयुक्तांचे आदेश
पुणे : वादग्रस्त व बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर यांच्याकडील शस्त्र परवाना पुणेपोलिसांनी रद्द केला आहे. पोलिसआयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश नुकतेच दिले. शस्त्राचा गैरवापर, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई केल्याचे आदेशात नमूद आहे.
मुळशी तालुक्यातील धडवली गावात शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याच्या आरोपावरून मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात २०२४ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित घटनेचा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी आर्म्स ॲक्ट अंतर्गत कारवाई केली होती. याशिवाय नवी मुंबई येथील रबाळे पोलिस ठाणे तसेच पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यातही त्यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तालयाकडून मनोरमा खेडकर यांना ‘शस्त्र परवाना रद्द का करू नये’ अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, वारंवार नोटीस देऊनही त्यांनी सुरुवातीला कोणताही खुलासा सादर केला नव्हता. काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन आपला जीव धोक्यात असल्याचा दावा करत म्हणणे मांडले. त्यानंतर त्यांनी लेखी खुलासा सादर केला. मात्र तो समाधानकारक नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
पोलिस आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे की, मनोरमा खेडकर यांचे वर्तन हे कायद्याला न जुमानणारे व गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, भविष्यात परवानाधारक शस्त्राचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, कुटुंबीय तसेच कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. त्या कारणास्तव त्या शस्त्र परवाना धारण करण्यास पात्र नसल्याची खात्री झाल्याने परवाना रद्द करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बाणेर येथील त्यांच्या बंगल्यात जबरी चोरीची घटना घडली असून, याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, याबाबत पोलिसांनी स्वतः तक्रार दिली आहे.