Finance Minister Lack Of Economics Knowledge: Zarita Letflung | अर्थमंत्र्यांना अर्थशास्त्राचे ज्ञान कमी :  झरिता लेतफ्लँग
अर्थमंत्र्यांना अर्थशास्त्राचे ज्ञान कमी :  झरिता लेतफ्लँग

पुणे : भारतीय जनता पक्षाचे आर्थिक धोरण दिशाहीन असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही देशाच्या आर्थिक स्थितीचे ज्ञान कमी आहे. त्यामुळे त्यांना जीएसटी व नोटबंदीच्या प्रश्नांवर ठोस उत्तर देता येत नाही, अशी बोचरी टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या झरिता लेतफ्लँग यांनी केली आहे. 
अर्थमंत्री सीतारामन यांनी शुक्रवारी पुण्यात विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधला. यादरम्यान जीएसटीबाबत एकाने ‘डॅम इट’ हा शब्दप्रयोग केला होता. त्यावर भडकलेल्या सीतारामन यांनी जीएसटीमध्ये काही त्रुटी असतील पण त्यामध्ये दुरूस्त्या केल्या जात असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेताना लेतफ्लँग म्हणाल्या, सीतारामन यांच्या वक्तव्यावरून शासनाची जीएसटीबाबतची मानसिकता दिसते. जीएसटी हे काँग्रसेच अपत्य आहे. डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळात याबाबत सखोल चर्चा झाली होती. पण भाजपा शासित राज्यांनी त्याला विरोध केला होता. भाजपा सत्तेत आल्यानंतर त्यांनी कायदा लागु करण्याचा निर्णय घेतला. जीएसटीमधील करश्रेणी १८ टक्क्यांपेक्षा अधिक असू नयेत, असे काँग्रेसने सुचविले होते. पण त्याकडे दुर्लक्ष करून तशीच अंमलबजावणी करण्यात आली. परिणामी सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांवर विपरीत परिणाम झाला. त्यानंतर जीएसटीच्या रचनेत बदल करण्याचा प्रयत्न सुरू झाला. 
भाजपा सरकारचा सर्वानुमतावर विश्वास नाही, असे दिसते. स्वत:ची मते लोकांवर लादली जात आहेत. सीतारामन या जीएसटी आणि नोटबंदीवर ठोस उत्तर देऊ शकत नाहीत. कारण त्यांना अर्थशास्त्राचे ज्ञान कमी आहे. सरकारची आर्थिक धोरणे दिशाहीन आणि चुकीची असल्याने जनता त्रासली असल्याचे लेतफ्लँग यांनी नमुद केले.
-----------

Web Title: Finance Minister Lack Of Economics Knowledge: Zarita Letflung

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.