पुणे बाजार समितीच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी अखेर स्वतंत्र समिती;पणन संचालकांनी दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 14:27 IST2025-07-09T14:26:39+5:302025-07-09T14:27:51+5:30
- अखेर पणन संचालक विकास रसाळ यांनी दि.७ ला स्वतंत्र समिती नेमून जिल्हा उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली वर्ग एक व दोन दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून स्वतंत्र चाैकशी समिती स्थापन केली आहे.

पुणे बाजार समितीच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी अखेर स्वतंत्र समिती;पणन संचालकांनी दिले आदेश
पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून बाजार आवारात अनेक गैर कामे केली गेली आहेत. याबाबत विविध संघटना व व्यापारी यांनी बाजार समितीच्या अनेक कारभाराच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर तत्कालीन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनीही चौकशीचे आदेश दिले होते. अखेर पणन संचालक विकास रसाळ यांनी दि.७ ला स्वतंत्र समिती नेमून जिल्हा उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली वर्ग एक व दोन दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून स्वतंत्र चाैकशी समिती स्थापन केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक मंडळ अस्तित्वात आहे. तेव्हापासून बाजार आवारात अनेक अनियमित, बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने कामे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पणनमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीचे आदेश गुलदस्त्यात होते. यावर अखेर पणन संचालक यांनी स्वतंत्र समितीची नेमणूक करून चौकशीचा आहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
- अशी आहे स्वतंत्र समिती
जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमणूक केली असून यात सात अधिकाऱ्यांची समिती आहे. यामध्ये जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग १ चे संजय पाटील, उपनिबंधक सहकारी संस्थांचे दिगंबर हौसारे, विशेष लेखापरीक्षक वर्ग १ विजय सावंत, सहायक निबंधक सुनील धायगुडे, विशेष लेखापरीक्षक वर्ग २ सुनील जाधव तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर आदींचा समावेश आहे.
५१ विविध कामांबाबतची होणार चाैकशी
२०२३ पासून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या कारभाराच्या विविध ५१ कामांबाबत चौकशी करण्याबाबतचे आदेश पणन संचालकांनी स्वतंत्र समितीला देण्यात आले आहेत. यात बाजारात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, बाजार समितीने भुसार बाजारातील १९ भूखंडधारकांना नोटिसा दिल्यानंतरही अनेक भूखंडांवर अनधिकृत बांधकामे, बाजार आवारात पार्किंग निविदा, सुरक्षारक्षक निविदा, अतिरिक्त दरांच्या निविदा, अनधिकृत बांधकामे, सेस चोरी, फूल बाजारातील गाळे वाटप अशा ५१ मुद्द्यांची चाैकशी होणार आहे.
बाजार समितीने भुसार बाजारातील १९ भूखंडधारकांना नोटिसा बजावल्या, त्यानंतरही अनेक भूखंडांवर अनधिकृत बांधकामे केली. बाजार आवारात विविध ठिकाणी टपऱ्या तसेच पार्किंग निविदा, सुरक्षारक्षक निविदा या सर्व बाबी संदर्भात तक्रारी आल्या आहेत. आता स्वतंत्र उच्च स्तरीय समिती याबाबत चाैकशी करणार असून दोषींवर कारवाई केली जाईल.
- विकास रसाळ, पणन संचालक