पेरण्यांचा मार्ग मोकळा

By Admin | Updated: June 23, 2015 03:21 IST2015-06-23T03:21:08+5:302015-06-23T03:21:08+5:30

मागील दोन दिवसांपासून नीरा देवघर व भाटघर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे

Fill the sowing route | पेरण्यांचा मार्ग मोकळा

पेरण्यांचा मार्ग मोकळा

सोमेश्वरनगर : मागील दोन दिवसांपासून नीरा देवघर व भाटघर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे. सोमवार (दि. २२) अखेर नीरा देवघर धरणक्षेत्रात ३०७ मिमी, भाटघर धरणक्षेत्रात २०६ मिमी, तर वीर धरणक्षेत्रात ११८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उशिरा का होईना पाऊस सुरू झाल्याने खरिपाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या पावसामुळे नीरा देवघर धरणात ९.३६ टक्के, भाटघर धरणात ९.७३ टक्के, तर वीर धरणात ११.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाचा असाच जोर राहिला, तर तीनही धरणे लवकरच भरतील, अशी माहिती पाटबंधारे खात्याचे विभागीय उपअभियंता डी. एम. डुबल यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाने लवकरच सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे. सुरुवातीला पावसाचा जोर कमी असला, तरीही मागील दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात संततधार सुरू आहे. धरणक्षेत्राबरोबरच नीरा खोऱ्यातही संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिरायती भागातील खरिपाच्या रखडलेल्या पेरण्या, तसेच नीरा खोऱ्यातील दि. १ जुलैपासून होणाऱ्या उसाच्या लागणीचा मार्ग मोकळा झाला आहे. खरीप हंगामातील तूर, सोयाबीन व बाजरीच्या पेरण्या होऊ शकतात, असे आघारकर अनुसंधान केंद्राचे प्रमुख अजित चव्हाण यांनी सांगितले.
गेल्या वर्षी जून महिना पूर्ण, तर जुलै महिना निम्मा कोरडा गेला होता. मात्र, या वर्षी पावसाने लवकरच सुरुवात केल्याने शेतकरीवर्गात समाधान आहे. गेल्या वर्षी १२ जुलैलाही सर्वच धरणे कोरडी होती. मात्र, या वर्षी जून महिन्यातच धरणांची पातळी वाढू लागली आहे. (वार्ताहर)

Web Title: Fill the sowing route