Father's death in beating by son over sale of land | जमीन विक्रीच्या कारणावरून मुलाने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू 
जमीन विक्रीच्या कारणावरून मुलाने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू 

पुणे : (सासवड ) :पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथे जमीन विक्रीच्या कारणावरून मुलाने वडिलांना केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोहन प्रकाश उरसळ ( वय ३० वर्षे ) असे आरोपी मुलाचे नाव असून प्रकाश बाबुराव उरसळ ( वय ५५ वर्षे ) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

  याबाबत मयत प्रकाश उरसळ यांची पत्नी शोभा प्रकाश उरसळ ( वय ५० वर्षे ) यांनी शनिवारी ( दि ९ ) सासवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शुक्रवारी ( दि ८  ) सायंकाळी ७ च्या सुमारास मारहाण झाली होती. आरोपी रोहन याला सासवड पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचे वृत्त असे, आरोपी रोहन हा जमीन विकायची असल्याचे त्याच्या वडिलांना वारंवार बोलत असे तर जमीन विकायची नाही असे त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले होते. या कारणावरून त्यांच्यात नेहमी वाद होती होते. शुक्रवारी ( दि ८  ) सायंकाळी ७ च्या सुमारास मुलगा रोहन याने घरी येऊन वडिलांना पुन्हा जमीन विकण्याच्या कारणावरून वाद घालत त्यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली तसेच भांड्यातील सुरीने प्रकाश यांच्या तोंडावर तसेच गळ्यावर आणि पाठीवर वार केले. त्यानंतर फिर्यादीने जखमीला वाघापूर येथील रुग्णालयात व त्यानंतर उरुळीकांचन येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शनिवारी ( दि ९ ) पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात घेऊन जात असताना उपचारापूर्वीच दुपारी १ . १५ वा त्यांचा मृत्यू झाला. सासवड पोलिसांनी आरोपी रोहन उरसळ यावर भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल आहे. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आर जे माने पुढील तपास करीत आहेत. 

Web Title: Father's death in beating by son over sale of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.