कर्जाचा डोंगर; वडिलांनी जीवनप्रवास अर्ध्यात संपवला, मुलींनी हार न मानता दहावीत मिळवले घवघवीत यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:49 IST2025-05-13T18:48:45+5:302025-05-13T18:49:36+5:30
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींनी आपल्या कुटुंबाच्या दुःखाच्या सावलीतही शिक्षणाची मशाल उजळवत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं

कर्जाचा डोंगर; वडिलांनी जीवनप्रवास अर्ध्यात संपवला, मुलींनी हार न मानता दहावीत मिळवले घवघवीत यश
अंकिता कोठारे
पुणे : एका बाजूला घरात कर्जाचा डोंगर, तर दुसऱ्या बाजूला वडिलांच्या आत्महत्येचा मानसिक आघात या सगळ्यातही या मुलींनी हार मानली नाही. या संघर्षमय प्रवासात त्यांचं ध्येय होतं शिक्षणाच्या जोरावर नव्या भविष्याची उभारणी करण्याचं. दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश संपादन करून या मुलींनी ते साध्य केलं आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धपूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुली पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर या प्रकल्पांतर्गत पुण्यामध्ये शिक्षण घेत होत्या.
दोन्ही मुलींच्या यशाबद्दल आईंनी कृतज्ञतेच्या भावनेने मुलींनी वडिलांचे नाव अजून मोठे करावे, अशी भावना व्यक्त केली आहे. ज्यांच्या आयुष्यातून वडिलांची सावलीसुद्धा हरवली, अशा मुलींनी यंदाच्या दहावी परीक्षेत यशाची शिडी चढली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींनी आपल्या कुटुंबाच्या दुःखाच्या सावलीतही शिक्षणाची मशाल उजळवत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. दुर्गा क्षीरसागर आणि नियती इंगोले या दोन्ही मुलांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेत ८६ आणि ७७ टक्के मिळवले असून, भविष्यात देशसेवा करणार असल्याचे सांगितले.
दुर्गा क्षीरसागर म्हणाली, घरी केवळ एक एकर शेती आहे. १४ वर्षांपूर्वी वडिलांनी आत्महत्या केली होती. आई शेती करते आणि मला तिचे कष्ट बघवत नाहीत. म्हणून जोमाने मेहनत केली आणि दहावीत ८६ टक्के मिळवले. पुढे मला आयपीएस अधिकारी व्हायचे असून, देशाची सेवा करायची आहे. तसेच बाबांच्या कष्टाचं चीज झालं. ते नसले तरी त्यांची आठवण माझी प्रेरणा ठरली, असं सांगताना मुलींच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.
नियती इंगोले म्हणाली, वडिलांनी कर्जामुळे आत्महत्या केली. आई नांदेड शहरातच मॉलमध्ये कामाला आहे. तिच्या कष्टामुळे आणि भोई प्रतिष्ठान आणि स्थानिक कार्यकर्त्यांमुळे मला शिक्षणासाठी खूप मदत झाली. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी शिक्षण आणि जिद्द यांच्या बळावर पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करायचेच असल्याची भावना यावेळी तिने व्यक्त केली.