टोमॅटोचे भाव उतरल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; नफा तर दूरच, गुंतवलेले भांडवल मिळणेही मुश्कील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 16:31 IST2025-07-15T16:31:18+5:302025-07-15T16:31:54+5:30

२० किलोच्या क्रेटला केवळ २०० ते ४५० रुपये भाव मिळत असल्याने गुंतविलेले भांडवल तर दूरच, तोडणी मजुरी, वाहतुकीचा खर्च देखील वसूल होत नाहीये

Farmers suffer losses of lakhs due to fall in tomato prices; Profits are far away, it is also difficult to get capital | टोमॅटोचे भाव उतरल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; नफा तर दूरच, गुंतवलेले भांडवल मिळणेही मुश्कील

टोमॅटोचे भाव उतरल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; नफा तर दूरच, गुंतवलेले भांडवल मिळणेही मुश्कील

ओतूर: सध्या टोमॅटोचे भाव कमालीचे उतरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले असल्याचे चित्र दिसत आहे. बळीराजा शेतात मेहनत करून स्वकर्तृत्वासह कौशल्याने उत्पादन मिळवतो. परंतु समाधानकारक भाव मिळत नसल्याने आर्थिक चणचण त्याच्या नशिबी आहे. कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या टोमॅटोचे यावर्षी भाव गडगडल्याने जुन्नरच्या तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकरी अल्पकाळात भरपूर व रोख उत्पन्न देणारी पिके म्हणून टोमॅटो हे पीक घेतात. टोमॅटोचे पीक नगदी व भांडवली असल्याने लागवडीपासून मागणी कमी अन् उत्पन्न जास्त आहे. एक एकरास पाच हजार किलो पेक्षा अधिक उत्पन्न घेणारे शेतकरी या भागात आहेत. छोट्या छोट्या प्लॉटच्या साह्याने जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन जीवन जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचे टोमॅटोचे भाव घसरल्याने आर्थिक नुकसान होत आहे. या भागातील टोमॅटो नारायणगाव मार्केट येथे जातो. टोमॅटोची आवक वाढल्याने दर कॅरेटचे दर २०० ते ४५० रुपयांवर आले असून सरासरी जुन्या टोमॅटोंना २०० ते ३०० रुपये बाजार आहेत. मागणी कमी उत्पन्न अधिक अशी परिस्थिती आहे. अवकाळीमुळे पिकांचे नुकसान झालेले असताना देखील काही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पीक वाढवले. परंतु, त्याचे दर घसरल्याने शेतकरी कोसळू लागला आहे. केलेला खर्चही निघत नसल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

लागवडीपासून प्रत्यक्ष उत्पन्न सुरू होईपर्यंत या पिकाची खूपच काळजी घ्यावी लागते. किटकनाशक फवारणी, मशागत, खतांचा खर्च असतोच. आधार देण्यासाठी लागणाऱ्या काठ्या व तारा, सुतळ्या आणि त्यासाठी द्यावी लागणारी मंजूरी. ज्यावेळी प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होते त्यावेळी ही खर्च मोठ्या प्रमाणात होतो. परंतु, याहीपेक्षा खर्चिक काम असते ते टोमॅटो झाडांना फळे आल्यानंतर नजीकच्या काळात दरात वाढ झाली नाही तर शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान होईल. शेतकरी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटो विकत असून पण काही टोमॅटो उत्पादक यांनी दर नसल्याने टोमॅटो शेतात ठेवणे पसंत केले 

टोमॅटो फेकून देण्याची वेळ

दरवर्षी बाजारभाव चांगले असतात यंदा मात्र सुरुवातीपासूनच टोमॅटोला बाजारभावाची साथ मिळालीच नाही. सुरुवातीला कॅरेटला ८०० रुपये भाव होते. नंतर ५००, ४५०, ३००,१५०,२०० असे दिवसागणित बाजार बदलत आहेत. यंदा उष्णतेचे अधिक प्रमाण त्यात अवकाळी पाऊस व मे महिन्यात आलेल्या सततच्या पावसामुळे टोमॅटो पांढरी माशी, करपा, काळा डाग आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यातच बाजारभाव देखील कमी मिळाले त्यामुळे फेकून देण्याची वेळ आली आहे. 

भांडवल निघणे कठीण

२० किलोच्या क्रेटला केवळ २०० ते ४५० रुपये भाव मिळत आहे. पण सरासरी एकरी दिड लाख रुपये भांडवल खर्च या दरातून गुंतविलेले भांडवल तर दूरच, तोडणी मजुरी, वाहतुकीचा खर्च देखील वसूल होत नसल्याचे टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे. टोमॅटो हे पीक शेतकऱ्यांना कधी मालामाल तर कधी उद्धस्त करणारे बेभरवशाचे पीक झाले आहे.

टोमॅटो बाजारात पडझड त्यात विकेल याची अजिबात शाश्वती राहिलेली नाही, चालू वर्षी मंजूरीसह,टोमॅटो वाहतूक खर्च दूरच लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मल्चिंग पेपर, तार, बांबू, मशागत, मजूर, खते, औषधे यामध्ये मोठी वाढ झाली आहे. पण बाजारभावात ताळेबंद नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. ऐन उन्हाळ्यात रात्रंदिवस कष्ट करून पिक जोपासत परिपक्व झालेलं टोमॅटो पिक पाहून शेतकरी सुखावून गेला होता. पण भाव घसरल्याने टोमॅटोची लाली उतरल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. सततच्या लहरी निसर्गापुढे शेतकऱ्यांनी हातच टेकले असून त्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे - प्रीतम डुंबरे, शेतकरी

 

Web Title: Farmers suffer losses of lakhs due to fall in tomato prices; Profits are far away, it is also difficult to get capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.