शेतकऱ्याला स्वत:चा मुलगा, सून, नातवांनी गंडवले; तब्बल १ कोटी हडप केले, मावळातील खळबळजनक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:38 IST2025-11-22T17:37:46+5:302025-11-22T17:38:40+5:30
शेतकरी वयोवृद्ध असल्याने ही रक्कम कोणीतरी फसवणूक करून खात्यातून वळवून घेतल्याचे सांगत शेतकऱ्याच्या मुलाने, सुनेने आणि नातवांनी खोटे नाटक केले होते

शेतकऱ्याला स्वत:चा मुलगा, सून, नातवांनी गंडवले; तब्बल १ कोटी हडप केले, मावळातील खळबळजनक प्रकार
पिंपरी : पीएमआरडीएच्या बाह्यवळण रस्त्यासाठी संपादन केलेल्या जमिनीच्या मोबदल्यातील एक कोटी ८२ लाख रुपये बँक खात्यातून परस्पर वळवून घेत ८९ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची फसवणूक केली. याप्रकरणी त्याचा मुलगा, सून आणि दोन नातवांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मावळ तालुक्यात ३१ जुलै २०२३ ते २६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.
मावळ तालुक्यातील पाचाणे येथील ८९ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने याप्रकरणी शुक्रवारी (दि. २१ नोव्हेंबर) शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) अंतर्गत बाह्यवळण रस्त्याचे (रिंगरोड) मावळ तालुक्यात काम सुरू आहे. त्यासाठी फिर्यादी शेतकऱ्याच्या मावळ तालुक्यातील शेतजमिनीपैकी ३८ गुंठ्यांचे भूसंपादन करण्यात आले. त्याचा मोबदला म्हणून पावणेतीन कोटींपर्यंत रक्कम शेतकऱ्याला मिळाली. शेतकरी वयोवृद्ध असल्याने ही रक्कम कोणीतरी फसवणूक करून खात्यातून वळवून घेतील, असे शेतकऱ्याच्या मुलाने, सुनेने आणि नातवांनी सांगितले. त्यानंतर शेतकऱ्याच्या सह्या घेत बँकेत जाॅईंट खाते काढले. शेतकऱ्याच्या मुलाने, सुनेने आणि नातवांनी या खात्यावरील एक कोटी ८२ लाख रुपये परस्पर त्यांच्या इतर खात्यांत वळवून घेतले.
दरम्यान, फिर्यादी वृद्ध शेतकरी बँकेत गेले असता त्यांच्या खात्यातून एक कोटी ८२ लाख रुपये वळवल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. मुलाने त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत मिळून स्वत:च्या वडिलांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक महेंद्र सपकाळ तपास करीत आहेत.
तिघांना समान वाटणी करायची होती
वृद्ध शेतकऱ्याला दोन मुले आणि एक मुलगी अशी तीन अपत्ये आहेत. या तिघांमध्ये शेतजमिनीची आणि इतर मिळकतीची समान वाटणी करण्याचे शेतकऱ्यांनी तिघांना सांगितले होते. मात्र, त्यापूर्वीच वृद्धत्वाचा फायदा घेत त्यांच्या मुलाने त्यांची फसवणूक केली.