एक्सप्रेस वेवर गॅस टँकरचा ब्रेक फेल, तीन गाड्यांना दिली धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 11:41 IST2021-05-10T11:38:50+5:302021-05-10T11:41:13+5:30
महामार्गावरील या दुर्घटनेत तीन व्यक्ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

एक्सप्रेस वेवर गॅस टँकरचा ब्रेक फेल, तीन गाड्यांना दिली धडक
पुणे - खालापूर तालुक्यातील मौजे-आडोशी हद्दीतील मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर पुणे ते मुंबई या लेनवर (KM 39) आज सकाळी अपघाताची घटना घडली. सकाळी 9.15 वाजता एका गॅस टँकरचा (HR 74-760) ब्रेक फेल झाल्याने तो टँकर तीन गाड्यांवर आदळला.
राज्यात सध्या कोरोनामुळे कडक निर्बंध लादण्यात आल्याने रस्त्यांवर वाहतूक अतिशय तुरळक प्रमाणात दिसून येते. केवळ अत्यावश्यक सेवेतील सेवाधाऱ्यांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, गॅस टँकरचा ब्रेक फेल झाल्याने टँकर पलटी झाला. सुदैवाने मोठ्या प्रमाणात वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. पुणे-मुंबई महामार्गावरील या दुर्घटनेत तीन व्यक्ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी, रस्त्यावरच हा टँकर पलटी झाल्याच्या अवस्थेत दिसून आला. ब्रेक फेल गॅस टँकरने MH43U9894 एशियार टेम्पो, MH12RN7380 टाटा टेलर आणि MH12SX4282 कंटेनर टेम्पो या तीन गाड्यांनी धडक दिली होती. या गॅस टँकरमध्ये प्रोफेलीन गॅस असल्याचे समजते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण तीन जणांना दुखापत झाली आहे.