Rain Update: पावसाळा संपला तरी अरबी समुद्रातील बाष्प पाडतोय पाऊस; पावसापासून सुटका कधी?
By श्रीकिशन काळे | Updated: October 21, 2024 16:09 IST2024-10-21T16:09:00+5:302024-10-21T16:09:22+5:30
शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात दिलासा मिळणार असून, हवामान कोरडे राहणार

Rain Update: पावसाळा संपला तरी अरबी समुद्रातील बाष्प पाडतोय पाऊस; पावसापासून सुटका कधी?
पुणे : राज्यातून नैऋत्य माॅन्सून परत गेला असला तरी देखील पाऊस पडत आहे, त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. अजूनही किती दिवस पाऊस असा सवाल शेतकरी देखील विचारत आहेत. शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात दिलासा मिळणार असून, हवामान कोरडे राहणार आहे. बंगालच्या उपसागरात २३ ऑक्टोबरनंतर ‘दाना’ चक्रीवादळ येणार आहे.
सध्या ईशान्य माॅन्सून सक्रिय असल्याने आणि अरबी समुद्रातील बाष्प येत असल्याने महाराष्ट्रात पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नैऋत्य मॉन्सून आणि अरबी समुद्राकडून येणारे बाष्प या दोन्ही वाऱ्यांमुळे महाराष्ट्रावर पाऊस पडत आहे. हवामानाची प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची तसेच २२ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच २३ ऑक्टोबरपर्यंत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होईल. त्यानंतर, ते उत्तर पश्चिम दिशेने सरकून २४ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीपासून वायव्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झालेले आहे. येत्या दिवाळीमध्ये पाऊस पडणार की नाही, याविषयी शंका व्यक्त केली जात होती. पण दिवाळीमध्ये हवामान कोरडे राहणार आहे. सध्या दक्षिण भारतामध्ये पाऊस सुरू आहे. तसेच महाराष्ट्रातही पाऊस पडत आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनूसार, मॉन्सून परत गेला तरी काही काळ पाऊस सुरूच राहतो. कारण राज्यावर बाष्प असते. तापमानही वाढलेले असते. यामुळे ढगांची निर्मिती होते आणि कमी वेळेत अधिक पाऊस पडतो. हीच स्थिती राज्यामध्ये निर्माण होत आहे. काही दिवस अशीच परिस्थिती असणार आहे आणि त्यानंतर हवामान कोरडे राहणार आहे.
बंगालच्या उपसागरात ‘दाना’ चक्रीवादळ २४ ते २५ ऑक्टोबरला उडीसाच्या किनारपट्टीवर तयार होणार आहे. त्याचा प्रवास उत्तर दिशेने होईल. त्याचा काहीही प्रभाव महाराष्ट्रावर होणार नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात हवामान कोरडे राहणार आहे. संपूर्ण दिवाळीमध्ये पावसाची शक्यता नसल्याने नागरिकांना हा सण दणक्यात साजरा करता येणार आहेे.
चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. २३ ऑक्टोबरपासून ओडिशाच्या काही भागांत मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.