कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 21:02 IST2025-11-28T21:01:52+5:302025-11-28T21:02:23+5:30
एकनाथ शिंदे पोकळ गप्पा मारत नाही अथवा आश्वासन देत नाही. एकदा कमिटमेंट केली की ती पूर्ण करतो. ऑन द स्पॉट डिसिजन घेतो

कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
मंचर: शहरात नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर लगेचच 105 कोटी रुपयांचा निधी दिला. नगरपंचायत जिंकल्यावर किती पैसे देणार याचा विचार करा. काहीजण बोलले निधीचा महापूर येणार. पैसे माझ्याकडून आले मात्र नाव त्यांचे, आईजीच्या जीवावर बाईजी उदार असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्न झाला पण त्यांची थोबाड बंद झाली आहेत. कोणीही माईका लाल आला तरी ही योजना बंद होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
मंचर नगरपंचायत निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा झाली त्यावेळी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री असताना अनेक योजना केल्या मात्र सगळ्यात आवडती योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. लाडक्या बहिणींनी राज्यात सत्ता आणली. आताही महिलांची उपस्थिती पाहता विजय पक्का आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. लाडक्या बहिणीचे राज्य आणायचा आहे असे सांगून ते म्हणाले एकनाथ शिंदे पोकळ गप्पा मारत नाही अथवा आश्वासन देत नाही. एकदा कमिटमेंट केली की ती पूर्ण करतो. ऑन द स्पॉट डिसिजन घेतो. होणार असेल तर काम करणारच. मंचर शहरासाठी भरीव निधी दिला जाईल. 133 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना तात्काळ मंजूर करू असा शब्द त्यांनी दिला. बिबट्याचा प्रश्न सोडवला जाईल असे सांगून ते म्हणाले, लाडक्या बहिणी, भाऊ व शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. शहराचा रोड मॅप तयार आहे. चांगले सुंदर शहर झाले पाहिजे. वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे त्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.